बारामती : काही दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामतीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी  शहरातील मुख्य चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाण झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.  17 मार्च रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी  या घटनेनंतर गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत धोत्रे (वय 22 वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा युवक बारामती शहरातील मुख्य चौकात असलेल्या एका चायनीज फूड स्टॉलवर आला होता. यावेळी अचानकपणे अनिकेतवर सहा जणांकडून लाठ्या-काठ्यां तसेच लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्यात अनिकेत जबर जखमी झाला होता. घटनेनंतर या जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रमाापेक्षा अधिक मारहाण झाल्यामुळे त्याचा उपचारादम्याम मृत्यू झाला. या मृत्यूमुळे अनिकेतच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

बेशुद्धावस्थेत असताना या युवकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 मार्च रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूर्व वैमन्यासातून ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.