‘बाळासाहेबांचे वारसदार सांगण्यासाठी मनगटात जोर असावा’ लागतो. मुख्यमंत्री शिंदे यांची, उद्धव ठाकरेंवर टीका

कोल्हापूर: शिवसेनेचे दोन दिवसांचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडले. त्याच्या समारोपावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘पक्षात असतील तर ते चांगले आणि पक्ष सोडला, की तो कचरा असे म्हटले जात आहे; परंतु हे कार्यकर्तेच तुमचा कचरा करतील, आणि ‘हम दो हमारे दो’च फक्त उरतील,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.

शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार सांगण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो. रक्ताचे पाणी करावे लागते आणि घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते. शिवसेना वाढवण्यासाठी कित्येकांनी हातभार लावला, कित्येकांच्या हत्त्या झाल्या आणि तुम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला पुढे झालात.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यांना मात्र बाळासाहेब नकोत. त्यांना संपत्ती हवी. ५० खोक्यांचा आरोप करताना यांना जनाची नाही; तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती; कारण शिवसेना आमच्या ताब्यात आल्यानंतर खात्यावरील पन्नास कोटी रुपये मागितले. ते मी त्यांना दिले. असहि मुख्यमंत्री शिंदे यावेळेस म्हणाले.

‘मातोश्री’ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पवित्र मंदिर होते; परंतु आता ती उदास हवेली झाली आहे. जिथून वाघाची डरकाळी ऐकायला यायची, तिथे दररोज फक्त शिव्याशाप ऐकू येत आहेत,’ अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.