बाळासाहेब असताना देशभरातील नेते…, आणि यांना दिल्लीत गल्लोगल्ली जावं लागतय : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते त्यांच्याकडे यायचे. परंतू, आता मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली फिरावं लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्व्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब असताना दिल्लीतील आणि देशभरातील मोठमोठे नेते इकडे येत होते. पण आता मला मुख्यमंत्री बनवा, असं म्हणण्यासाठी यांना दिल्लीच्या गल्लोगल्ली जावं लागतय. ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती होते. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांना पुढे नेत आहोत. आम्ही राज्यालासुद्धा पुढे नेत असून अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत. राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचं ध्येय आहे,” असे ते म्हणाले.

मालवण दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल. यामध्ये कुणालाही क्षमा नाही. सरकार कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे जे लोकं अफवा पसरवतात त्यांना मोठी चपराक मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आहे. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. परंतू, त्याचं राजकारण करणं हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा करण्याकरिता प्रयत्न करत आहोत,” असेही ते म्हणाले.