जळगाव : बुध्द पौर्णिमेनिमित्त गुरुवार २३ रोजी यावल वनविभागात वन्यप्राणी गणना करण्यात येणार आहे. यात निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी केले आहे.
यावल वनविभागात चोपडा वनक्षेत्रपासून रावेर वनक्षेत्र मधील ठिक ठिकाणी जंगल भागात मचान तयार करण्यांत आलेले आहेत. यावल वनविभागात चोपडा वनक्षेत्रात ३, वैजापुर वनक्षेत्रात ७ मचान, अडावद वनक्षेत्रात ४ मचान, देवझिरी वनक्षेत्रात ४ मचान, यावल पुर्व वनक्षेत्रात ७ मचान, यावल पश्चिम वनक्षेत्रात ६ मचान तर रावेर वनक्षेत्रात १२ मचान ते ६ व्यक्ती एका असे एकुण ४३ मचान यावल वनविभागात तयार करण्यांत आले आहे. यामचाणवर ५ व्यक्ती एकाच वेळेस बसु शकतात. बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपुर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
यावल वनविभागातील वन्यप्राणी गणनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमे-याव्दारे देखील गणना केली जात असून नवखे निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच विदयार्थी यांना देखील संपुर्ण रात्र जंगलात थरारक अनुभव लुटता यावा त्याबोत दर्शन देणा-या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणुन यावल वनविभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले जाते. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाशात निसर्गानुभव घेत असतांना तसेच रात्री प्राणी प्रगणना करीत असतांना प्रामुख्याने बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, यांसह चितळ, भेडकी, चौशिंगा, सायाळ, नीलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षीही आढळतात. जंगल सफारीच्या दरम्यान वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभवही मिळतो.
यावल वनविभागातील नैसर्गिक पाणवठयांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुध्द पाणी पुरवठा करणे, पाणवठया शेजारी बांधलेली मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरु आहेत. यावल वनविभागात निसर्ग प्रेमींना जंगल सफारी मार्गाचा सुध्दा चांगला घेण्यासाठी नियोजन केले जात आहे. या प्राणी प्रगणना करीता काही अडचण आल्यांस आपण स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांचेशी संपर्क साधावा. यावल वनविभागातील सातपुडयामधील निसर्गरम्य अनुभवाची संधी सर्वप्रथम मिळत असून लोकांनी निसर्गानुभवासाठी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवावा.
याचे नियोजन धुळे वनसंरक्षक निनू सोमराज , यावल वनविभाग उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, सहा. वनसंरक्षक प्रथमेश वि. हाडपे यांच्या मागदर्शनाखाली वनपरिक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजुर करीत आहेत.