बेपत्ता मुलगी सापडली तब्ब्ल इतक्या.. वर्षानंतर परतताच गहिवरले संपूर्ण कुटुंब

बोदवड ः वयाच्या 15 व्या वर्षी मुलगी कुटूंबापासून दुरावली. सर्वत्र शोध घेवूनही मुलगी न सापडल्याने मुलगी जिवंत नाही ही आशाच कुटूंबाने सोडली मात्र तब्बल 30 वर्षानंतर अचानक मुलगी समोर आली अन्‌‍ कुटूंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील आत्मसन्मान फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच 30 वर्षांपूर्वी हरवलेली त्यावेळची कांता व आत्ताची कांतादेवी रमेश वानखेडे (45, ओझर, ता.खामगाव) ही कुटूंबात परतल्यानंतर कुटूंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही.

सुमारे 30 वर्षांपूर्वी कांता अचानक बेपत्ता झाली व सर्वत्र शोध घेवूनही मुलगी सापडत नसल्याने वानखेडे कुटूंबियांनी आशाच सोडली मात्र काळ बदलत गेला अन्‌‍ भटकंती करीत कांता एव्हाना 44 वर्षांची होवून मुक्ताईनगर तालुक्यात पोहोचली. राहुल पाटील आणि ऋषिकेश पाटील यांना रस्त्याच्या कडेला भिजत असलेली महिला पाहून त्यांनी तिला आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे उपचारार्थ दाखल केले. वर्षभराच्या मुक्कामात कांताला आपले नाव व पत्ता आठवू लागला व केअर टेकर शुभांगी पाटील व मनीषा यांना कांताने आपले नाव कांतादेवी वानखेडे व गावाचे नाव सांगितल्यानंतर आत्मसन्मान फाउंडेशनचे पदाधिकारी ओझर, ता.खामगावला कांतादेवीला घेवून पोहोचले. 30 वर्षानंतर मुलीला पाहताच कुटूंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही व आईच्या डोळ्यातून नकळत घळाघळा आनंदाश्रू तरळले. हा प्रसंग पाहून उपस्थितही भावूक झाले. कांतादेवी यांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी अविनाश भिसे यांनी रुग्णवाहिका तर गौतम बरडिया यांनी येण्या-जाण्याचा खर्च दिला.