जळगाव : शेतातून म्हशींचा चारा घरी आणत असताना बांधावर गाडीचे एक चाक चढून बैलगाडी उलटी झाली. या अपघातात चौदा वर्षीय बालकाच्या कपाळाला गाडीचा अँगल लागला. विळाने कान कापला गेला. या घटनेत गौरव आनंदा पाटील (वय १४, रा. वाकडी ता. जळगाव) या बालकाचा मृत्यू झाला. सोमवार ११ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना वाकडी शेतशिवारात घडली.
गौरव हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असून तो म्हसावद येथील थेपडे विद्यालयाचा विद्यार्थी होता. वाकडी (लमांजन गावा जवळ) घरी म्हशी असल्याने त्यांना चारा आणण्यासाठी गौरव आज शेतात गेला. त्याचे वडिल शेतात काम करत होते. त्याचे वडिल आनंदा नामदेव पाटील यांनी चाराच्या पेंढ्या बैलगाडीत ठेवून बैलगाडी जुंपून दिली. ही बैलगाडी गौख शेतातून घरी आणत होता. शेताच्या एका बांधावर बैलगाडीचे एक चाक वर आणि एक चाक बांधाच्या खाली राहिल्याने बैलगाडी उलटी झाली. या विचित्र अपघातात दोन्ही बैलही उलटे झाले.
घटनेने सैरवैर झालेल्या बैलांच्या ताकदीने त्यांना जुंपलेली दुसरचे दोन तुकडे झाले. गाडी कठड्याचा अँगल गौरव याच्या कपाळात गेला. तर विळाने त्याचा कान कापला जावून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना लक्षात येताच गौरवचे वडिल घटनास्थळी धावून गेले. त्यांनी तत्काळ त्याला अलगत उचलत गावात आणले. त्यानंतर तत्काळ वाहनातून वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता बालकास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले.
गौरव याला त्याच्यापेक्षा दोन वर्षान वर्षानी मोठा भाऊ सौरव तर दहा वर्षाची बहिण मनिषा, आई ज्योतीबाई, वडिल असा परिवार आहे. या दुर्घटनेने वाकडी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.