मुंबई : महाराष्ट्राच्या मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा संदेश आला. हा संदेश मिळताच अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. या मेसेजमध्ये मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. संदेश मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलीस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा संदेश आला होता. यानंतर वाहतूक पोलिसांनी शहर पोलीस आणि गुन्हे शाखा एटीएसला माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांनीही काही संशयास्पद ठिकाणांची झडती घेतली, मात्र त्यांना काहीही मिळाले नाही. रात्री उशिरा जॉइंट सीपींनी याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शहर पोलिसांसह गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला
हे कृत्य कोणीही केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ज्या क्रमांकावरून हा मेसेज पाठवला गेला आहे त्या नंबरवर पाळत ठेवण्यात आली आहे. मोबाईल लोकेशन सापडताच आरोपींना अटक करण्यात येईल. मात्र, हे कृत्य कुणीतरी खोडसाळपणे केले असावे, अशी भीती पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.