Ameya Khopkar : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, आतिफ अस्लम हा LSO90 या बॉलिवूडमधील चित्रपटातील गाणं गाणार आहे. पण आता आतिफच्या बॉलिवूडमधील कमबॅकला मनसेविरोध करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे.
अमेय खोपकर यांचे ट्वीट
अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “आतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलिवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा-पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलिवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय.” अमेय खोपकर यांनी याआधी देखील पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपटांबाबत वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यावर मनेसनं विरोध दर्शवला होता. ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाचा विरोध देखील अमेय खोपकर यांनी केला होता.