नवी दिल्ली : ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी बुधवार, दि. २४ जुलै २०२४ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. प्रलंबित असलेला भारत-यूके मुक्त व्यापार करार (FTA) आणि ब्रिटनमधील खलिस्तान समर्थक घटकांच्या कारवायांवर द्विपक्षीय बैठकीत विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्यपूर्वेतील परिस्थिती यासह गंभीर जागतिक आव्हानांवरही दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे की, “ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे नवी दिल्लीत आगमन झाले आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत होईल. यासोबतच भारत आणि ब्रिटनमधील संबंध मजबूत होतील.”
ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी या दौऱ्यात भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचीही भेट घेणार आहेत, या भेटीत प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर चर्चा होईल. अहवालांनुसार, दोन्ही बाजूंनी आधीच सुमारे ९० टक्के व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे. याआधी दि. ६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश पीएम स्टारर यांच्यात फोनवर चर्चा झाली होती.
यावेळी दोन्ही नेत्यांनी प्रस्तावित एफटीएची चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यास संमती दर्शवली होती. या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, दोन्ही नेत्यांनी परस्पर फायदेशीर भारत-यूके मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने काम करण्यास सहमती दर्शविली आहे.