जळगाव : संसारामध्ये अनंत अडचणी येत असतात, यावर मात करण्यासाठी भगवान महावीरांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे, ज्याप्रमाणे अर्जूनाने श्रीकृष्णाला आपली ताकद म्हणून उभे राहण्याची विनंती केली, त्याप्रमाणेच भगवान महावीरांचे विचार हे कृतिशील आचरणात आणा. सत्य, अहिंसा, प्रेम दया ही स्वत:ची ताकद बनवा आणि मोक्ष प्राप्ती करा, असा उपदेश परमपूज्य विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी धर्मसभेत केले.
स्वत:च्या जीवनात महावीरांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे समजणे खूप कठिण आहे. चौवीस तास महावीरांचे विचार आपल्यासोबत असून ते शाश्वत आहेत, प्राणवायूप्रमाणे ते मनुष्य जीवनात कार्य करतात फक्त ते अनुभूवता आले पाहिजे. तशी दृष्टी असावी. त्यातून एक दृष्टिकोण मिळतो. भगवान महावीर यांचे जन्मोत्सवानिमित्त दोन नियम अंगिकारले गेले पाहिजे, ते म्हणजे स्त्रीयांविषयी द्वेष भावना न ठेवता आदरयुक्त भाव ठेवला गेला पाहिजे. व्यसनांपासून दूर होऊन प्रभू भगवान महावीर हे आपल्याला व्हिजीबल असून तेच व्हिजन असतात ही भावना ठेवली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी जगात कुठलेही लहान बाळ हे मातृप्रेमापासून वंचित राहू नये, तरुण सौभाग्यवती विधवा होऊ नये, वयोवृद्ध बापाला आपल्या मुलाची-मुलीची अंत्ययात्रा खांद्यावर न्यावी लागु नये ह्याची प्रार्थना केली पाहिजे. कुठल्याही धर्माचा असो अंत्ययात्रे ठिकाणी मोबाईल नेऊ नये, व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असा मौलिक सल्ला उपस्थितीत सुश्रावक-श्रावकींना परमपूज्य विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी दिला.
शोभायात्रेतून समाजोपयोगी संदेश
सकल जैन श्री संघ प्रणित श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरवात ही शोभायात्रेद्वारे झाली. वासुपुज्यजी जैन मंदिराच्या प्रांगणातून ध्वजवंदन होऊन वरघोडा शोभायात्र काढण्यात आली. शोभायात्रा ही चौबे शाळा, सुभाष चौक, नवीपेठ, सरस्वती डेअरी, नेहरू चौक मार्गे सेंट्रल मॉल मध्ये समारोप झाला. मतदानाचा हक्क वाजवा, झाडे लावा, पुत्रीचा सन्मान करा, पाणी वाचवा यासह सामाजोपयोगी संदेश शोभायात्रेत लक्ष वेधून घेत होते. संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, कार्याध्यक्ष कस्तुरचंदजी बाफना, श्रीमती नयनताराजी बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, प्रदीप रायसोनी, रजनीकांत कोठारी, ललित लोडिया, मनिष जैन, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया, भगवान जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. भगवान महावीरांच्या विचारांनी शोभायात्रेदरम्यान असलेले चौकांमध्ये विशेष सजावट केली होती. शोभायात्रेत अग्रभागी नवकार मंत्र प्रचार वाहन होती. त्यानंतर चार घोडेस्वार चार ध्वजधारी, सजीव देखावे, बग्गीमध्ये भगवान महावीरांची प्रतिमा, गुरु महाराज, १०८ कलधारी महिला, बॅण्ड, जैन मंदिराचा चांदिचा रथ त्यात मूर्ती ही शोभायात्रेचे आकर्षण होते. शोभायात्रेचा समारोप खान्देश सेंट्रल मॉल येथे झाला.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, पुस्तकांचे विमोचन
शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामीजी २६२३ वा जन्म कल्याणक महोत्सवाच्या शोभायात्रेच्या समारोपाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, कस्तुरचंदजी बाफना, श्रीमती नयनताराजी बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, प्रदीप रायसोनी, रजनीकांत कोठारी, ललित लोडिया, मनिष जैन, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया, भगवान जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड उपस्थित होते. सामूहिक गुरुवंदना झाली. गौतम प्रसादीचे लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड परिवाराचा सकल श्री संघाच्या वतीने दलिचंदजी जैन यांनी मानपत्र देऊन गौरव केला. मानपत्राचे वाचन स्वरूप लुंकड यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे अन्नदान करण्यात आले.
तत्पूर्वी डॉ. ज्ञान प्रभाजी म.सा. यांनी संथारा घेऊन देवगमन झाल्याने त्यांचे नवकार मंत्राद्वारे स्मरण करण्यात आले व श्रद्धाभाव अर्पण केला गेला. स्वागत गीत लॉकडाऊन महिला मंडळाच्या सदस्यांनी केले. नवकार मंत्राचे स्मरण श्रद्धा महिला मंडळाने केले, जैन ध्वजगीत जैन महिला मंडळातर्फे सादर करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. श्रेयस कुमट यांनी आभार मानले.
समिति अध्यक्ष पारस राका यांनी प्रस्तावना व्यक्त केली. जळगाव सकल श्री संघ म्हणजे एकतेचे प्रतिक असून हृदयपूर्व बंधूभावातून भगवान जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले. गौतम प्रसादी लाभार्थी छाजेड परिवारातर्फे बडनेरा येथील सुदर्शन गांग यांनी मनोगत व्यक्त केले. मनुष्य जन्म हा दुर्लभ असून जैन धर्मात तेही भारतात जन्म मिळाल्याने धन्य झाले असून कांताबाई इंदरचंद छाजेड परिवार हे परिश्रम आणि सेवेचे पाईक आहेत हा संस्कार त्यांना दलुबाबा जैन यांच्या सहवासातून मिळाल्याचे ते म्हणाले. मानवतेच्या सेवेत जीवनाची सर्वात आनंदाची अनुभूती असते असे ते म्हणाले. प्रियेश छाजेड यांनी सर्वांनी प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संघपती दलिचंदजी जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘प्रेम, करुणा, अहिंसाचा त्रिवेणी संगण म्हणजे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव होय. मानव जीवन समजून घेण्यासाठी महावीरांचे विचार ऐकणे आणि प्रत्यक्ष जीवनात आचरण आणणे महत्त्वाचे आहे.’
‘अर्जी तेरी मर्जी तेरी’ या पुस्तकाचे विमोचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि कस्तुरचंदजी बाफना यांच्याहस्ते झाले. जैन युवा फाउंडेशनतर्फे सकल जैन समाजाची डायरीच्या ऐप app चे अनावरण करण्यात आले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून साकार झालेल्या ‘जे टू जे’ डायरीचे जीतो युथ विंग तर्फे प्रकाशन केले गेले.
भव्य रक्तदान शिबीर
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त जय आनंद ग्रुपतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणीसह देहदान, नेत्रदानाचे अर्जही भरुन घेतले जात होते. रक्तदान शिबीरात संध्याकाळ पर्यंत २७१ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. इंडीयन रेडक्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी जय आनंद ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जळगाव झाले महावीरमय
जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकासह विविध मुख्य चौक महावीर प्रतिमेने, जैन चिन्हांनी, महावीर संदेशांनी सजविण्यात आले होते. ते नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते.