पाचोरा : भडगाव तालुक्यातील 3 महसूल मंडळ मधील 18,174 शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाईपोटी 8 कोटी 8 लाख 88 हजार 343 रुपये मंजूर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल.तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील इतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी देखील आपला पाठपुरावा सुरू असून त्यासाठी देखील प्रयत्नशील आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांचा विमा काढला होता. त्या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यात सरासरी प्रजन्यमान फार कमी झाले होते. तसेच जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाया जातील हे निदर्शनास येताच भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25 टक्के अग्रीम रक्कम नुकसान भरपाई पोटी मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
शेतकऱ्यांना दिलासा
मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करीत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25 टक्के अग्रीम रक्कम मिळावी ही मागणी लावून ठेवली होती. पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार सलग 21 दिवस पावसाचा खंड (2.5 पेक्षा कमी पाऊस)पडल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याची 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई देय असल्याने अमोल शिंदे यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच या पाठपुराव्यासाठी व मदतीमुळे भडगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त होत आहेत.