भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटले, अखेर आरोपी गजाआड

जळगाव : भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटल्याची घटना जामनेर ते शहापूर रोडवर १८ फेब्रुवारी रोजी घडली होती. यावेळी चोरटयांनी तब्बल १ लाख ९३ हजारांची रोकड लांबविली. या प्रकरणात जामनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अखेर फरार संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

निलेश रतन पवार रा. जामनेर हे विवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास बॅगेतून १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीने घराकडे निघाले होते. त्यावेळी त्यावेळी जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या तिन जणांनी त्यांचा रस्ता आडवून बेदम मारहाण केली व सोबत असलेली रोकडची पिशवी घेवून पसार झाले होते. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, व्यापाऱ्याची लुट ही कुसुंबा येथील ऋषीकेश रमेश मावळे रा. कुसुंबा ता. जळगाव याने केली असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी ऋषीकेश रमेश मावळे रा. कुसुंबा ता. जळगाव याला पथकाने अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील हस्तगत केली आहे. इतर दोन जण अद्याप फरार आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधिर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, महिला पो.कॉ. राजश्री बाविस्कर यांनी केली.