भविष्यात बेळगाव बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब: केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

बेळगाव: २३ फेब्रुवारी ऊस पीक आता केवळ साखर उत्पादनासाठी मर्यादित राहिले नाही. उसाद्वारे इथेनॉल उत्पादन मोठ्या स्वरूपात घेतले जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मोठे ऊस उत्पादन पाहिल्यास भविष्यात बेळगाव इथेनॉल उत्पादनाचे हब शकते. त्यासाठी कर्नाटक राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न अपेक्षित असल्याचे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील १,६२२ कोटी रुपये खर्चुन होनगा- झाडशहापूर चौपरी रिंगरोड, ९४१ कोटी रुपये खर्चुन चिक्कोडी बायपास ते गोटूर चौपदरी रस्ता, शिरगुप्पी ते अंकलीपर्यंत ८८७ कोटी रुपये खर्चुन तर रस्त्याचे रुंदीकरण असे १३ हजार कोटी रुपये खर्चुन ६८० किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना गडकरी यांनी चालना दिली. यावेळी ते बोलत होते. बेळगावातील रिंगरोड संदर्भात कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्याची वेळ जुळून आली आहे. बेळगावातील बायपास रस्त्यामुळे बेळगाव ते गोवा आणि बेळगाव-हुनगुंद-रायचूर या महामार्गामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. बेळगाव ते संकेश्वर महामार्गाला वन विभागाची वेळेत अनुमती न मिळाल्यामुळे काम रखडले आहे. राज्य सरकारने यातील अडथळे दूर करून कामाला चालना द्यावी, असे गडकरी यांनी सांगितले.

देशभरातील ग्रीन कॉरिडॉर महामार्गाच्या विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देत आहे. प्रदूषण कमी होईल. पर्यावरणपूरक महामार्गाची निर्मिती होईल. बेळगावात ऊस
उत्पादन जादा घेतले जाते. उसापासून इथेनॉल निर्मितीमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढविले आणि इथेनॉल पंप सुरू केल्यास वाहनधारकांना केवळ ६० रुपयांत इंधन मिळू शकेल. त्यामुळे शेतक-यांना चांगला नफा मिळेल. शेतकरी आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.