भव्य स्वप्नांना पंख विजेचे…

प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक मानसिकता, सातत्य, प्रयत्न, गतिशीलता आणि सुयोग्य संतुलन या सर्वच मार्गाने व्यक्ती आणि समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होऊ शकते, हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जगातील अनेक देश राजकीय, सामाजिक, आर्थिक अस्थिरतेच्या गर्तेत असताना, तेथे अव्यवस्था, अराजक माजले असताना, भारतात मात्र PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात लोकशाही मार्गाने देश सर्वच क्षेत्रात प्रगतीकडे, विकासाकडे वाटचाल करीत आहे. विस्तारवादी आणि साम्राज्यवादी ड्रॅगन, नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान असे ‘सख्खे-शेेजारी’ भारताच्या आजूबाजूला असताना, तसेच रशिया-युक्रेन यांच्या युद्धाच्या झळा सहन करूनही भारताने विकासाकडे, प्रगतीकडे आपली वाटचाल जोमाने सुरूच ठेवली आहे, हे सरकारच्या व जनतेच्याही सामूहिक प्रबळ इच्छाशक्तीचे मूर्त स्वरूप आहे.

ख्यातनाम विचारवंत आणि लेखक अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, ‘आपला आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन ठरवत असतो.’ हे वाक्य केवळ व्यक्तीलाच नव्हे, तर राष्ट्राला देखील लागू होते. एखाद्या वस्तूबद्दलची, गोष्टीबद्दलची आवड अथवा नावड, त्या गोष्टीकडे, परिस्थितीकडे बघण्याची तुमची मानसिकता म्हणजे दृष्टिकोन. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टिकोन हे तुमची मन:स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेला तुमचा तुमच्या भोवतालच्या जगाबद्दलचे मत याचे एक मिश्रण असते. तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे कसे बघता आणि त्यावर भविष्य कसे ठरवता यावर तुमचा दृष्टिकोन ठरत असतो. आपला दृष्टिकोन कसा आहे, यावर आपण कृती करतो की निष्क्रिय राहतो हे ठरत असते. ही गोष्ट केवळ व्यक्तीलाच नव्हे, तर देशातील नागरिकांनाही तेवढीच लागू आहे. कारण देशातील नागरिकांच्या दृष्टिकोनावरही प्रगती व विकासाची वाटचाल ठरत असते. यादृष्टीने पाहता जागतिक संकटे येऊनही व आर्थिक आघाडीवर प्रतिकूलता व संघर्षाची स्थिती असूनही भारतीयांनी आपल्या दृष्टिकोनामुळे आणि सकारात्मक मानसिकतेमुळे या सर्वांवर यशस्वीपणे मात केली आहे, असे नक्कीच म्हणता येईल.

अर्थात लोकांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रतिकूलतेवर मात करण्याचे सामर्थ्य येण्यासाठी देशाचे नेतृत्वही तेवढेच आत्मविश्वासपूर्ण, कणखर आणि वज्रनिर्धाराचे असावे लागते. भारताच्या आणि भारतीयांच्या सुदैवाने PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्याला असे नेतृत्व लाभले आहे. एकेकाळी गुलामगिरीच्या साखळदंडात जखडलेल्या भारताची यशोगाथा आज जग प्रेरणेसाठी वाचते. गरीब म्हणून पाहिले जाण्यापासून ते पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या आकांक्षेपर्यंत भारताने हे सर्व दृढनिर्धाराने केले आहे. देशाने स्वातंत्र्यानंतरच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा इतिहास अतिशय पराक्रमाने, लवचिकतेने, महत्त्वाकांक्षेने उत्कृष्टपणे लिहिला आहे. अनेक युद्धे, नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थिरता, साथीचे रोग आणि आर्थिक आव्हानांचा आपण कुशलतेने सामना केला आहे आणि करीत आहोत. जगाला कवेत घेण्याची क्षमता आमच्याकडे आली. आम्ही विश्वगुरू बनण्याचा निर्धार केला. आम्ही सृजनाच्या, नवनिर्माणाच्या नव्या दिशांचा शोध घेतला. आम्ही आमच्या दिव्य संस्कृतीचा उद्घोष केला. समृद्धीची शिखरे चढलो. सर्वांगीण विकासाची प्रारूपे तयार केली. एकात्मतेची गीते लिहिली. पंतप्रधानांनी सांगितलेल्या नव्या मूल्यांचा उद्घोष केला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार वाटचाल सुरू केली. त्यामुळेच जगातल्या विविध क्षेत्रांवर हुकूमत गाजवण्याचे सामर्थ्य भारताला प्राप्त होत आहे.

आम्ही अंगीकारलेल्या नव्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपण सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती करू शकलो आहोत. यामध्ये शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, शेतीपासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत, समाजकल्याणापासून ते परराष्ट्र संबंधांपर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते परोपकारापर्यंत आणि मनोरंजनापासून ते खेळापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांचा समावेश आहे. 140 कोटींच्या या देशात शाळा, महाविद्यालये आणि उच्चतम शिक्षण देणार्‍या विद्यापीठांची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ लक्षणीय आहे. आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागासह गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचली आहे, पोहोचत आहे. आपले बुद्धिमान विद्यार्थी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवीत आहेत. संकटातही संधी शोधा, असे आमचे पंतप्रधान देशातील तरुणाईला नेहमीच सांगत असतात. ‘मेक इन इंडिया’ व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहणार्‍या तरुणाईने संकटातच संधी शोधणे हेच आपले ध्येय बनवले आणि ते पूर्ण करून दाखवूनही दिले. आज आपण देशाच्या भूतकाळातील वैभव आणि यशाचा आनंद लुटत आहोत. परंतु, सर्वात मोठी लोकशाही असल्याने वर्तमानावर लक्ष ठेवणे तसेच भविष्यासाठी प्रभावी योजना तयार करणे आपल्यासाठी आता खूप महत्त्वाचे आहे. आजपासून 24 वर्षांनंतर म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या 100 वर्षांनंतर आपला देश कुठे असेल? 2047 च्या भारतासाठी आपल्याकडे कोणती दृष्टी आहे? याचे प्रारूप, आराखडा निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

देशातील जागृत, चैतन्यमयी युवाशक्तीने यावर निश्चितच विचारमंथन केले पाहिजे. कारण भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांचे सामर्थ्य, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता यावरच देशाच्या प्रगतीची वाटचाल अवलंबून आहे. कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी त्या-त्या देशातील तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच कौशल्य विकासाचा मंत्र अंगीकारून आणि आधुनिक व्यवस्थापन तंत्रानुसार वाटचाल करीत देशाला सर्वच आघाड्यांवर यश मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी तरुणाईवर येऊन ठेपली आहे. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका’ आणि ‘बळ हेच जीवन व दुर्बलता म्हणजे मृत्यू’ असा तेजस्वी संदेश तरुणाईला देणार्‍या स्वामी विवेकानंदांची जयंती याच जानेवारी महिन्यात आहे. ‘जय हिंद, चलो दिल्ली’चा उद्घोष करून मरणासन्न राष्ट्रात नव्याने प्राण फुंकणार्‍या देशगौरव सुभाषचंद्र बोस यांची जयंतीही याच जानेवारी महिन्यात आहे आणि लोकशाही व्यवस्थेची वारंवार आठवण करून देणारा गणराज्यदिनही याच महिन्यात आहे. हा निव्वळ योगायोग नाही. तर राष्ट्र व समाजाविषयीचे आपले कर्तव्य काय आहे, याची नव्याने आठवण करून देण्यासाठीच जणू हे सगळे घडून येत आहे. जे राष्ट्र आपला इतिहास आणि भूगोल विसरते ते राष्ट्र आपले अस्तित्व व अस्मिता गमावून बसते, असे ख्यातनाम विचारवंत व्ही. के. मेनन यांनी म्हटले आहे.

केंद्रात भाजपाप्रणीत रालोआचे सरकार आल्यानंतर देशात इतिहासाचे नव्याने पुनर्लेखन होत आहे. आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या पण देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या महापुरुषांची देशाला नव्याने ओळख करून दिली जात आहे. भारताला पुन्हा जगज्जननी करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळेच कोरोनासारख्या महामारीच्या प्रभावातून बाहेर पडताना आणि सर्वांगीण ग्रामीण आणि शहरी विकास सुनिश्चित करून समृद्धीची नवीन उंची गाठत विश्वगुरू आणि जागतिक महासत्ता बनण्याची आकांक्षा भारताने बाळगली आहे. ज्यांचा आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवायची ज्यांची तयारी आहे, त्या देशातील लोकांसाठी सर्व काही उत्तमच होणार आहे. सकारात्मक दृष्टिकोनाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट घडलेली नाही, घडत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीने आपल्या भविष्याचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. स्वप्नपूर्तीसाठी तरुणाईचे विजेचे पंख सोबत आहेत. या प्रवासात दिसणारी आणि न दिसणारी सर्व आव्हाने स्वीकारून देश पुढे निघाला आहे.