नंदुरबार : कंत्राटी भरतीबाबत भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. त्याविरोधात जिल्हा भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील जुन्या नगरपालिका चौकात हे आंदोलन झाले. महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नीलेश माळी आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलत होते. कंत्राटी भरतीबाबत भाजपला भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन करून नीलेश माळी म्हणाले, मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली, असे म्हणून दोष देत नौटंकी करीत आहेत. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे काँग्रेसने केलेले पाप आहे. ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररीत्या उघड केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, प्रदेश सदस्य तथा अक्कलकुवा विधानसभा निवडणूक
प्रमुख नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस बळीराम पाडवी जिल्हा, सरचिटणीस कपिल चौधरी, जिल्हा सरचिटणीस संदीप अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस, डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष काजल मछले, जिल्हा सचिव नरेंद्र माळी, जिल्हा सचिव भीमसिंह राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष प्रेमराज पाटील, जिल्हा सचिव मनीषा निकम, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहादा विधानसभा निवडणूकप्रमुख कैलास चौधरी, प्रशांत पाटील, खुशाल चौधरी, दिनेश पाठक, नवापूर तालुका अध्यक्ष सत्यानंद गावित, सरिता चौधरी, रोशनी राजपूत, जयेश चौधरी, हर्षल पाटील, निरंजन भामरे, जयंत गवळी, मोहित मराठे, आदित्य भामरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.