भाजप अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंच्या नावांची चर्चा,कोण घेणार जेपी नड्डांची जागा ?

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यात त्यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे.

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यात त्यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी काही नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. सुनील बन्सल, ओम माथूर, के लक्ष्मण यांची नावेही भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

जेपी नड्डा यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली नसती, तर नवा अध्यक्षांचा शोध घेतला गेला नसता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जेपी नड्डा यांचा भाजप अध्यक्ष म्हणून कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे. नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही, त्यामुळे अध्यक्षपद एखाद्या मुरब्बी नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु कऱण्यात आली आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रदान, सीआर पाटील यांची नावे चर्चेत होती. पण या सर्वांनाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे ही सर्व नावे मागे पडली असून भाजप नव्या नेत्यांच्या शोधात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सुत्रांच्या माहितीनुसा, भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ऐनवेळी अशा नेत्याचे नाव समोर येईल, ज्याची प्रसार माध्येमे कल्पनाही करु शकणार नाहीत. २००९ मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवत सर्वांनाच धक्का दिला होता. आताही धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो.

विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा –
विनोद तावडे मागील दोन वर्षांपासून केंद्रीय राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचंदिल्लीतील राजकीय वजन वाढलेय. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी विनोद तावडेंकडे दोन वर्षांत अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या. त्याला तावडेंकडून योग्य तो न्याय देण्यात आला. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये तावडेंनी शानदार कामगिरी केली. त्याआधी पंजाबमध्येही त्यांनी आपला करिष्मा दाखवला होता. चंदीगड, हरियाणा आणि बिहार राज्यांचे तावडे प्रभारी राहिलेत. राष्ट्रीय महासचिव म्हणून काम करणारे तावडेंनी संघटनात्मक बांधणीमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तावडे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.