रत्नागिरी: काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर, विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची रणनीती भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर आखण्यात आल्याची माहिती आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पुन्हा यंदा उमेदवार असल्याचं बोललं जातात आहे, यामुळे जर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली तर ही लढत तुल्यबळ होईल तसेच नारायण राणे यांचा कोकणातील संपर्क, कोकणातील अभ्यास, नारायण राणे यांचे कोकणातील अनेक नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध या सगळ्याचा मोठा उपयोग या लोकसभा निवडणुकीत भाजपला होऊ शकतो.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल व केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोन्ही नेत्यांना आता लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये भागवत कराड यांचाही समावेश आहे.