भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आ.अमरिशभाई पटेल यांचे कार्य प्रेरणादायी

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचे कार्य राज्यभरासाठी आदर्शवत, प्रेरणादायी आहे. शिरपूर तालुक्यात त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील विकासकामांमुळे ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते ठरले आहेत. शिरपूर तालुक्यातील हजारो सर्वसामान्य माणसापर्यंत शासनाच्या असंख्य योजना आमदार कार्यालयातील 50 स्वयंसेवकांच्या टीममार्फत प्रत्यक्षपणे पोहोचवण्याचे भगीरथ कार्य भाईंनी केले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले. शहरातील एस. एम. पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे महाविजय संकल्प 2024 सुपर वॉरियर शिरपूर विधानसभा अंतर्गत 142 प्रभावशाली सुपर वॉरियर बैठक 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा विभाग संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकरराव चव्हाण, सांगवी मंडल अध्यक्ष सत्तारसिंग पावरा उपस्थित होते.

यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकास गाथा घरोघरी पोहोचवायची आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा मोठ्या प्रमाणात यशस्वी करुन सर्वांनी घर चलो संपर्क अभियान, बूथ अभियान प्रभावीपणे राबवा. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अमरिशभाई पटेल यांनी सरल ॲपचे काम हजारोंच्या संख्येने केल्याबाबत महाराष्ट्रभर अनेक बैठकांमध्ये कौतुक केले.

भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर आमदार कार्यालय “विकास योजना आपल्या दारी अभियान“ मार्फत विविध योजनांची माहिती व लाभार्थी संख्या त्यांनी वाचून आनंदाने आश्चर्यच व्यक्त केले. आयुष्मान भारत योजना 60 हजार, मोतीबिंदू ऑपरेशन 40 हजार, चष्मे वाटप 40 हजार, संजर गांधी निराधार योजना 40 हजार, अर्थकुटुंब सहाय्य योजना (एका वेळेस 20 हजार रु.) 15 हजार, बांधकाम कामगार योजना 26 हजार, बाल संगोपन योजना 75, कोविड -19 सहानुग्रह योजना (50 हजार रु.) 265, वन सातबारे वाटप 12 हजार 460, पीएम किसान सन्मान निधी नोंदणी 6 हजार, ई श्रम कार्ड नोंदणी 4 हजार, वृद्ध कलावंत मानधन योजना 72, वृद्ध कलावंत अर्थ सहाय्य (कोविड-19) 5000 रु. प्रमाणे 141, आत्मा योजना कृषी गट 70 गट (आदिवासी) 70 लाभार्थी, असंख्य आधार कार्ड नोंदणी व अद्यावत करणे, असंख्य दिव्यांग बांधवांना मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले असून 110 दिव्यांग बांधवांना मोफत अपंगत्व प्रमाणपत्र वाटप तसेच पिक विमा 2400 शेतकरी यांना 22 कोटी रुपये लाभ भाईंनी मिळवून दिला असे सांगून विश्वकर्मा योजना 12 बलुतेदार साठी नव्याने मोदीजी यांनी सुरु केली असून भाजपा तर्फे प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कामात देखील शिरपूर तालुका अग्रेसर असल्याचे सांगितले. सर्व उपस्थित व अभाविप अध्यक्ष नयन माळी या सर्वांनी  स्फूर्तिगान म्हटले. आभार प्रभाकरराव चव्हाण यांनी मानले.