जळगाव : देशासह राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षात युत्या आणि आघाड्या होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मनसे आणि भाजप एकत्र येणार अश्या चर्चा आहेत. दरम्यान, मनसे आणि भाजप युतीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘मनसे-भाजप युती होईल की नाही माहित नाही पण यासंदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. आजकाल कशाचंच काही सांगता येत नाही. राष्ट्रवादी आणि भाजपची युती होईल असं कधी कुणाला वाटलं होतं का? शिवसेना भाजपला सोडून गेली होती, पुन्हा खरी शिवसेना भाजपसोबत आली. खरी राष्ट्रवादीपण भाजप सोबत आली. शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते होते, ते अशोक चव्हाण आज भाजपसोबत आलेत. त्यामुळे उद्या कोण आमच्यासोबत येईल हे माहिती नाही. सगळ्याच पक्षाचा कल आता हा विकासाच्या मार्गाकडे आहे. देश तिसऱ्या नंबरवर आलाय. पंतप्रधान मोदींवर सगळ्यांचा विश्वास आता वाढत चाललाय’, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.