भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी रविवारी महायुतीचा मेळावा – आमदार सुरेश भोळे

जळगाव ः भाजप शिंदे गट तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी सह मित्र पक्षांचे राज्यात सरकार आहे. या सर्व पक्षाच्या मित्र पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सरकारातील नेत्यांप्रमाणेच समन्वय असावा, यासाठी जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. हा महायुती मेळावा 14 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. ते गुरुवार,11 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, भाजपा उप जिल्हाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरीता कोल्हे माळी, शिवसेना उप जिल्हाप्रमुख ज्योती चव्हाण, भारती म्हसके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील, आरपीआय आठवले गट महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यावेळी उपस्थित होते.आमदार भोळे यांनी शिवसेनेने जळगाव लोकसभा केलेल्या दाव्याला उत्तर देताना सांगितले की, हा निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांना असतो आम्ही कार्यकर्ते असून कार्यकर्त्यांचे काम हे मेरा बूथ सबसे मजबुत हेच असल्याचे आ. भोळे यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या 15 घटक पक्षांचा मेळावा
महायुतीच्या या मेळाव्यात महायुतीचे 15 घटक पक्ष आहेत. राज्यस्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार या सर्वांच्या समन्वयाने तिन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून हा समन्वय मेळावा घेण्यात येत आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर दिली.

विश्वासहर्ता निर्माण करण्यासाठी मेळावा – उमेश नेमाडे
राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार राज्यात चांगल्याप्रकारे काम करत आहे. महायुती ज्या समन्वयाने कार्य करत आहे तोच समन्वय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात राहिला पाहिजे.सर्वांनी एक दिलाने काम करावे हा मेळाव्यामागे उद्देश आहे.