भारताचा ईएफटीएसोबत मुक्त व्यापार करार

नवी दिल्ली :  भारत आणि चार देशांच्या युरोपीय मुक्त व्यापार संघाने (ईएफटीए) रविवारी गुंतवणूक, वस्तू आणि सेवांबाबत द्विस्तरीय मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. याबाबत माहिती देताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले, मागील १६ वर्षांपासून कराराबाबत चर्चा सुरू होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले.

या करारामुळे येणाऱ्या १५ वर्षांत देशात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. भारताच्या वतीने या करारावर गोयल यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी स्वीस फेडरलचे कौन्सिलर व स्वित्झर्लंडवे मंत्री गाइ पार्मेलिन, आइसलॅण्डचे विदेश मंत्री बजरनी बेनेडिक्टसन लिकटेंस्टीनचे मंत्री डोमिनकी हस्लर व नॉर्वेचे व्यापार व उद्योगमंत्री जान क्रिश्चियन वेस्ट्रे यांची उपस्थिती होती. ईएफटीएमध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलॅण्ड व लिकटेंस्टीन या देशांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, या करारामुळे भारताचे ईएफटीए देशांशी वस्तू,सेवा व गुंतवणुकीसाठी सहकार्यराहील. मागील १६ वर्षांपासून हा करार करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भारत जगातील पहिला विकसनशील देश आहे ज्याचा ईएफटीएसोबत करार झाला. यामुळे देशात गुंतवणुकीचा वेग वाढणार असून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच १५ वर्षांत देशात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. करारामुळे विविध १४ प्रकारच्या वस्तू व सेवांसाठी असणारे तांत्रिक अडथळे दूर झाले.