भारताचे आयसीसी विजेतेपदाचे स्वप्न मोडले, ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला ‘अंडर-19 विश्वचषकाच्या’ विजेतेपदाचा मानकरी

India vs Australia: ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताचे आयसीसी विजेतेपदाचे स्वप्न मोडले आहे . गेल्या 8 महिन्यांत तिसऱ्यांदा कांगारूंनी टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव केला आहे. रविवारी 2024 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे कांगारूंनी 14 वर्षांनंतर अंडर-19 विश्वचषक जिंकला. पहिल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे.

2024 अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली ,ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंग (६४ चेंडूत ५५ धावा, तीन चौकार, तीन षटकार), हॅरी डिक्सन (५६ चेंडूत ४२ धावा), कर्णधार ह्यू वायबगेन (६६ चेंडूत ४८ धावा) आणि ऑलिव्हर पीक (४३ चेंडूत नाबाद ४६) महत्त्वाच्या खेळी खेळल्या. मात्र, अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम फेरीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावा करून सर्वबाद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाने गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा वाढवली होती. आता त्याच्या ज्युनियर संघाने गेल्या वेळच्या चॅम्पियन भारताला सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकू दिला नाही.