भारताच्या अर्थसंकल्पातून चीन समर्थक मुइझूला धक्का; मालदीवच्या मदतीत ३७० कोटीची कपात

नवी दिल्ली : भारत सरकार दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात आपल्या शेजारी देशांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करते. यावेळी सुद्धा केंद्रातील मोदी सरकारने शेजारी देशांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारत सरकारने भूतानला २०६८ कोटी रुपयांची विकास सहाय्य निधी देण्याची तरतूद केली आहे. पण, त्यासोबतच भारताने मालदीवच्या मुइझू सरकारला चांगलाच धक्का दिला आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने मालदीवला ४०० कोटींची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. गतवर्षी भारताने मालदीवला ७७० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. मालदीवला वाटप करण्यात आलेल्या निधीतील कपात अशा वेळी आली आहे जेव्हा चीन समर्थक मानले जाणारे मोहम्मद मुइझू राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झालेला आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) एकूण २२,१५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षीची तरतूद २९,१२१ कोटी रुपये होती. अंतरिम अर्थसंकल्पात मालदीवला ६०० कोटी रुपयांच्या विकास मदतीचा अंदाज होता. अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार, मालदीवसाठी केलेली तरतूद आता केवळ ४०० कोटी रुपये आहे. भूतानसाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात २०६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षी ही रक्कम २३९८ कोटी रुपये होती.