भारतातील पहिला ‘सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’ महाराष्ट्रात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’चे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापे, नवी मुंबई येथे उदघाटन करण्यात आले. यासोबतच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी १४४०७ हा हेल्पलाईन क्रमांक देखील लॉंच केला. यावेळी गृहमंत्री फडणवीस यांनी उपस्थित पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “काळाची पावले ओळखत २०१७-१८मध्ये सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’ची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सरकार बदलल्यावर हा प्रकल्प ‘बंद’ झाला. परंतु पुन्हा सरकार आल्यावर या प्रोजेक्टला पुढे नेण्याचे काम युद्धपातळीवर झाले. महाराष्ट्र भारताची फिनटेक राजधानी आहे. ‘तंत्रज्ञान सुसज्ज ‘पोलीसिंग’ मध्येही महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे सेंटर करणार आहे.  येत्या काळात भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षित पोलीस दल महाराष्ट्राकडे असेल,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

तसेच, पुढे ते म्हणाले,” ‘Learn, unlearn आणि relearn’ हा २१ व्या शतकाचा मंत्र आहे. तंत्रज्ञान नेहमीच बदलत असते, त्यामुळे तंत्रज्ञानातील प्रणाली हाताळणारे लोक गतिमान असायला हवेत. या केंद्रामार्फत दरवर्षी ५००० पोलिसांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे. इतकी मोठी क्षमता तयार केल्यानंतर ती आपल्यापर्यंत मर्यादित ठेवणे योग्य नाही, आपण विकसित केलेली क्षमता इतर राज्यांना देणेही तेवढेच गरजेचे आहे. म्हणूनच या सेंटरचे एक कॉर्पोरेशन बनविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या माध्यमातून खासगी कामे घेणे शक्य असल्याने महसूल प्रवाह तयार होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी सुचवले. यावेळी महाराष्ट्र पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.