नवी दिल्ली: २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत.या भव्य कार्यक्रमात सहभागी होणारे ते फ्रान्सचे सहावे नेते असतील.गुरुवारी ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून ते राजस्थानची राजधानी जयपूर येथून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील आमेर किल्ला, हवा महल आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा ‘जंतर मंतर’ला ते भेट देतील.यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5.30 वाजता इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करतील आणि दोन्ही नेते जंतर मंतर, हवा महल आणि अल्बर्ट हॉल संग्रहालयासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विविध ठिकाणांना भेट देतील.
इमॅन्युएल मॅक्रॉन उद्या (शुक्रवारी) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे ९५ सदस्यीय मार्चिंग पथक आणि ३३ सदस्यीय बँड पथकही परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच हवाई दलाचे एअरबस A330 मल्टी-रोल टँकर वाहतूक विमानही या समारंभात सहभागी होणार आहेत.