भारत मोठी झेप घेण्यासाठी सज्ज: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: सध्याच्या काळात भारत मोठी झेप घेण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला. देशाला नेतृत्व तसेच राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिले जाईल, अशा प्रकारे तरुण पिढीला तयार करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.विकसित भारत-२०४७ साठी तरुणांना कल्पना सादर करता याव्यात, यासाठी तयार करण्यात आलेल्या विकसित भारत अॅट रेट २०४७ : व्हॉईस ऑफ युथचे लॉन्चिंग नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भारताची युवा शक्ती परिवर्तनाचे एजंट आणि परिवर्तनाचे लाभार्थी आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या जीवनात इतिहास हा एक कालखंड प्रदान करतो, जेव्हा तो त्याच्या विकास यात्रेत वेगाने प्रगती करतो.

भारतासाठी सध्या अमृतकाळ सुरू आहे आणि देशाच्या इतिहासातील हा मोठी झेप घेत असल्याचा काळ आहे. भारतासाठी ही योग्य वेळ आहे. या अमृतकाळाच्या प्रत्येक क्षणाचा वापर करावा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. देशभरातील राजभवनांमध्ये आयोजित कार्यशाळेत मोदींनी विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित केले. देशाचे नागरिक म्हणून आमच्यासाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अमृतकाळाचे २५ वर्षेआपल्यासमोर आहेत. त्यासाठी आपण चोवीस तास काम करायला पाहिजे. आपण तरुण पिढीला अशा प्रकारे तयार केले पाहिजे की, ती देशाला नेतृत्व देईल आणि इतर गोष्टींपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देईल, असे मोदी यांनी सांगितले. देशाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तरुणांद्वारे सक्षम होत आहे. येत्या २५-३० वर्षांमध्ये काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्येच्या बाबतीत भारत अग्रेसर राहणार आहे, हे जगाने ओळखले असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.