मालेगाव: राज्य शासनाने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नसल्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोसह आमदार, खासदार मंत्र्यांना दारात फिरकू देऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्याचा पहिला फटका माजी आमदार यांना बसला. पंकज भुजबळ हे गुरुवारी (दि. २२) नांदगाव मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यात येणाऱ्या गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना बहाणे येथे मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने त्यांना माघारी परतावे लागले. त्यामुळे मराठा आंदोलक व भुजबळ परिवार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
या घटने नंतर मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले असून त्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. पंकज भुजबळ यांना अडवले ते कोण लोक होते, काय होते हे बघितले पाहिजे, भुजबळ कुटुंबीय आले तर त्यांना मारा, असे वक्तव्य केले जात आहे. भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे, घाबरणार नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. पंकज भुजबळ यांचा ताफा अडविण्याचे कारण नाही. निवडणूक प्रचारासाठी लोक गावात जातील, त्यांना अडवणे लोकशाहीला धरून नाही. आरक्षण दिल्यानंतर आंदोलन का? आम्ही विरोध केला असता तर आंदोलन केले तर ठीक होते. त्यांना जे नेता मानतात अशा सर्व लोकांना माझा नमस्कार, असे म्हणत भुजबळांनी हसत हसत जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना हात जोडले.