भुसावळ : बारावी परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून शांततेत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपराला भुसावळात ५० तर यावल तालुक्यात ६० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दोन्ही तालुक्यांमध्ये परीक्षेवर बैठे पथक थांबून होते. विद्यार्थ्यांना यंदादेखील १० मिनिटांचा अधिक वेळ मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार होवू नये यासाठी सर्वच परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त दिसून आला.
भुसावळात ५० विद्यार्थ्यांची दांडी
भुसावळ शहरासह तालुक्यातील सात केंद्रांवर बुधवारी इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. त्यात प्रविष्ट तीन हजार १२५ विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ७५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ५० विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ शहरासह तालुक्यात सात परीक्षा केंद्रावर बैठे पथकाने भेट दिली. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावल तालुक्यात ६० विद्यार्थ्यांची
यावल तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ पासून इयत्ता बारावी परीक्षेला सुरळीत सुरूवात झाली. सकाळी ११ ते एक या वेळेत मराठी व उर्दू विभागातील एकूण तीन हजार ५९१ विद्यार्थी इंग्रजीचा पेपरसाठी प्रविष्ट होते मात्र ६० विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक व चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. सात परीक्षा केंद्रांना दोन कस्टडीयन आहेत. यावल कस्टडीतील डॉ. झाकीर हुसेन उर्दू स्कूलचे पाच, साने गुरुजी सार्वजनिक विद्यालय चिंचोलीचे सात मिळून एकूण यावल कस्टडीतील ३८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. गटशिक्षणाधिकारी यावल विश्वनाथ धनके हे यावल कस्टडी सांभाळत आहे. फैजपूर कस्टडीत तीन परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी पीएसएमएस स्कूल बामणोदच्या चार, धनाजी नाना कॉलेज फैजपूरचे १४ तर डॉ. मौलाना आझाद उर्दू हायस्कूल फैजपूच्या चार मिळून एकूण २२ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. फैजपूर कस्टडीमध्ये भुसावळचे शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी सांभाळत आहे. सात केंद्रावर एकूण इंग्रजी विषयाचा पेपर तीन हजार ५९१ पैकी तीन हजार ५३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच परीक्षा केंद्रावर केंद्र बैठे पथक असल्याने परीक्षा शांततेत पार पडल्या.