तरुण भारत लाईव्ह । गणेश वाघ । राज्यातील बदलत्या समीकरणांचा परिणाम भुसावळातील राजकारणावरही दिसून आला आहे. भुसावळातील राष्ट्रवादीच्या दहापैकी दोन माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली असून, आगामी काळात आणखी दोन माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. भुसावळातील माजी नगरसेवकांचे आता भाजपात ‘इनकमिंग‘ वाढल्याने राष्ट्रवादीसाठी ही बाब धोक्याची घंटा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथराव खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष नेतृत्वाने खडसेंना उत्तर महाराष्ट्राचे नेते म्हणून जवाबदारी दिल्यानंतर खान्देशातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले, मात्र शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळले व शिंदे गटासोबत भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. भुसावळातील राजकारणावरही त्याचा परीणाम दिसून आला. खडसे हेच आमचे नेते आहेत, असे म्हणणारे आता भाजपकडे वळू लागले आहेत. माजी नगरसेविका पती देवेंद्र वाणी व माजी नगरसेवक किरण कोलते यांनी भाजपच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी वाढवली आहे, तर आगामी काळात आणखी दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये येण्याची तयारीत आहेत.
‘या’ कारणास्तव वाढला भाजपकडे ओढा
नगरपालिकेच्या २०१६च्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालिन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग १ ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग १ अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), ऍड. बोधराज दगडू चौधरी (९ ब), शोभा अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते (२२ ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) हे निवडून आले, मात्र त्यांनी २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच १७ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नियमानुसार भाजपतून बाहेर पडताना राजीनामा देणे अपेक्षित होते मात्र तसे न करता पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता व त्यामुळेे भाजपने जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल करीत संबंधिताना अपात्र करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे ज्या भाजपने या नगरसेवकांना अपात्र केले त्याच भाजपकडे माजी नगरसेवकांचा ओढा वाढला आहे. केंद्रासह राज्यात आलेली भाजपची सत्ता, आमदार संजय सावकारे यांचे सर्वांना घेऊन चालणारे तत्व व नागरिकांचा भाजपला वाढता प्रतिसाद पाहून व निधी मिळण्यास आडकाठी येणार नसल्याने या नगरसेवकांनी भाजपकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे दोन गट; त्यात भाजपचे आव्हान
भुसावळात माजी मंत्री खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना मानणारे दोन गट आहेत. आम्ही एकसंघ असल्याचा दावा भलेही होत असला तरी त्यात तथ्य नाही. खडसे व चौधरींमध्ये दिलजमाई होणार नाही, हे सांगण्यासाठी भविष्य वर्तवण्याची गरज नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासह पक्षातून बाहेर पडत असलेले निष्ठावान थांबवण्याचे आवाहन खडसेंपुढे तर असेल शिवाय भुसावळकरांना दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासनांची पूर्ती झाली? संथ गतीने सुरू असलेली अमृतयोजना, रेल्वे अतिक्रमणग्रस्तांचा निवासस्थानांचा प्रश्न, दर्जेदार रस्त्यांचा अभाव व शहराचा विकास का रखडला? या प्रश्नांची उत्तरे खडसेंना आगामी काळात मतदारांना द्यावी लागतील शिवाय भाजपला थोपवण्याचे कडवे आव्हानही त्यांच्यापुढे असेल यात शंकाच नाही.