भोपाळमधील कारखान्यातून १,८१४ कोटींचे ‘एमडी’ जप्त, ‘एटीएस’ ची मोठी कारवाई

मध्य प्रदेश : भोपाळ येथील कारखान्यातून अधिकाऱ्यांनी एमडी नावाचा मादकपदार्थ आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. याचे मूल्य १,८१४ कोटी रुपये आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मादकपदार्थ नियंत्रण विभागाने शनिवारी भोपाळजवळील बागरोडा येथील कारखान्यात केलेल्या संयुक्त कारवाईत घन आणि द्रव स्वरूपातील ९०७.०९ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. गुजरात एटीएसने उद्ध्वस्त केलेला हा मादकपदार्थांचा आजवरचा सर्वांत मोठा कारखाना आहे. दररोज २५ किलो एमडी तयार करण्याची क्षमता या कारखान्यात होती, अशी माहिती एटीएसने दिली.

छापा टाकण्यात आला, त्यावेळी कारखान्यात मादकपदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची तयारी केली जात होती. छापेमारीत अमित चतुर्वेदी आणि सन्याल प्रकाश बाणे या दोन जणांना अटक करण्यात आली.

बाणेचे महाराष्ट्र कनेक्शन
यातील सन्याल प्रकाश बाणेला २०१७ मध्ये महाराष्ट्रातील अंबोली येथे एमडीच्या जप्ती प्रकरणात अटक झाली होती आणि तो पाच वर्षे तुरुंगात होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली. सुटकेनंतर त्याने सहआरोपी चतुर्वेदीसोबत बेकायदेशीरपणे एमडी तयार करून विकण्याचा कट रचला आणि मोठ्या प्रमाणात नफा कमावला. यासाठी त्याने भोपाळच्या बाहेरील एक कारखाना भाड्याने घेतला, अशी माहिती एटीएसने दिली.