मंत्री अनिल पाटील यांच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मान्यता, नुकसानग्रस्तांसाठी 106 कोटी मंजूर

जळगाव : राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी, म हाराष्ट्रात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांसह इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रुपयांच्या निधी वितरित प्रस्तावाला राज्यशासनाने मंजुरी दिली आहे.

राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व मालमत्ता नुकसानीची मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी तसेच नागरिकांकडून मागणी होत होती. तीन- चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून निधी वाटपाला अखेर मान्यता देण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतरही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काही प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत निधी मंजुरीला मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांसह इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना दिलासा मिळणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.