चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ चाळीसगावात राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी ७ मार्च रोजी होणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व भाजपामहायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चाळीसगाव येथे नुकतेच उपप्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालय मंजूर झाले. या कार्यालयाचे उद्घाटन व नवीन वाहनांचा ५२ नोंदणी शुभारंभ सकाळी ११ वाजता शहीद हेमंत जोशी क्रीडांगण, महात्मा फुले कॉलनी, भडगाव रोड, चाळीसगाव येथे होणार आहे. चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन दुपारी १ वाजता हॉटेल सदानंदसमोरील घाटरोड, चाळीसगाव येथे होईल. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या २५९ घरांच्या वसाहतीचे भूमिपूजन दुपारी १.३० वाजता दस्तुरी फाटा, दोन मुखी हनुमान मंदिर, बोढरे (ता. चाळीसगाव) येथे होईल.
याशिवाय चाळीसगाव तालुक्यासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग (जि.प. जळगाव) यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या सुमारे ३ कोटी रूपये निधीतून होणाऱ्या उर्वरित बांधकामाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण आणि चाळीसगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे