मतदारसंघाच्या विकास कामांसाठी 43 कोटींचा निधी मंजूर आमदार किशोर पाटील यांनी मानले राज्य सरकारचे आभार

पाचोरा; पाचोरा – भडगाव मतदारसंघात रस्ते कॉक्रेटिकरण, डांबरीकरण व अत्यावश्यक ठिकाणी पुलांची कामे करण्यासाठी डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात राज्यशासनाकडुन 43 कोटीचा निधी मंजूर झाला असून फेब्रुवारीत आचारसंहिता लागण्याअगोदर मतदार संघात ही विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषद प्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृउबा सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, सुनिल पाटील, किशोर बारवकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, पाचोरा तालुका हा दुष्काळ सदृश्य होता. त्यामुळे जलयुक्त शिवार, जलसंपदा व जलसंधारणासाठी 200 ते 250 कोटींची कामे मागील पाच वर्षात केल्यामुळे भुजल पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची अडचण आता येत नाही. मोठ्या प्रमाणात शेतीचा वापर रहिवासासाठी झाल्याने शेती व्यवसाय कमी झाला. मात्र उर्वरित शेती बागायत झाल्याने शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या ट्रान्सफरची मागणी वाढत आहे.

भविष्यातील विजेची समस्या मार्गी लावण्यासाठी मतदारसंघात विजेचे जाळे निर्माण करणार आहे. सुमारे 150 किलोमीटर शेतरस्ते पाचोरा तालुक्यात मंजूर झाले असून शेतकऱ्यांनी शेतरस्ते कामात अडचणी न आणता शेतरस्त्यांना प्राधान्य द्यावे. उद्योग व्यवसाय आणि बेरोजगारी निर्मूलनासाठी तालुक्यात औद्योगिक वसाहतीचा विषय मार्गी लागला आहे. याठिकाणी पाणी, विज, रस्ते ही व्यवस्था मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा परिसर रेल्वेच्या मुख्य मार्गावर असल्याने भविष्यात रेल्वेचा एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीला जाऊन भेट घेणार आहे. मतदार संघ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा असल्याने 85 कोटींची सुतगिरणीची मंजुरी मिळाली असून भाग भांडवलाचा विषय मार्गी लावण्याच्या कामाला गती मिळाली आहे. 2024 च्या आत ही सूतगिरणी उभी करून येथे 7 ते 8 हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. शहरी भागात सांडपाणी व्यवस्थापन व पिण्याच्या पाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी 2017 ते 2023 पर्यंत काम सुरू आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता भविष्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 50 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

हे काम 6 ते 8 महीन्यात पूर्ण होणार आहे.शहरातील रेल्वे लाईन पलिकडील भागात रस्ते कॉक्रेटिकरण कामाचा बजेट 100 कोटींचा आहे. तसेच रेल्वे पुल हायवेच्या दोन्ही बाजुने सर्व सोयीयुक्त ऑक्सीजन पार्क, स्कॉयवाक निर्माण करायचे आहे. पुरातन राममंदिरात जाण्यासाठी जैनपाठ शाळेच्या बाजुने नवीन मार्ग व पुलाची संकल्पना आहे. त्याचप्रमाणे स्विमिंगटँक, जॉगिंग ट्रॅक, नाट्यगृह, इनडोअर खेळासाठीच्या विकास कामाची संकल्पना आहे.शहरालगत असलेल्या धार्मिक स्थळातील काकनबर्डी परिसर विकास कामासाठी 17 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तेही काम लवकरच सुरू होत आहे. 17 कोटींचे उपजिल्हारूग्णालय वर्षभरात पाहण्यास मिळेल.व्यापारी भवन व आठवडे बाजारातील व्यापारी संकुलाचे काम सुरू झाले आहे. भडगाव शहरासाठी 110 कोटींची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्यात आहे. अशा मतदार संघातील शेकडो कोटींच्या विकास कामांची माहीती यावेळी दिली. मतदार संघाच्या विकास कामासाठी 43 कोटींचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांनी राज्य शासनाचे आभार मानले.