जिल्ह्यात नवयुवकांना मतदार होण्याची संधी!

जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2023 रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादी छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 जानेवारी रोजी वा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नवमतदारांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 साठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जिल्हाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या युवकाचे वय 1 जानेवारी 2023 रोजी वा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा नवमतदारांसाठी नोंदणी केली जाणार आहे. तसेच 10 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात नवमतदार वा गावात स्थलांतरीत कायमस्वरूपी वास्तव्य असलेले, विवाहानंतर नव्याने आलेल्या स्त्रिया यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच स्थलांतरीत, विवाहानंतर अन्य गावात गेलेल्या महिला, मयत मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची क्रिया केली जाईल. तसेच 19-20 नोव्हेंबर आणि 3-4 डिसेंबर असे सुटीच्या दिवशी विशेष नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे.

त्यानुसार 9 नोंव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर 8 डिसेंबरदरम्यान हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील तसेच पूर्वी नवमतदारांसाठी आता वर्षभर थांबावे लागत होते. त्यात बदल होऊन आता वर्षभरातून चार वेळा निवडक तारखांना मतदार नोंदणी करता येईल, असेही जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगीतले.

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कमी अधिक मतदार संख्येनुसार मतदान केंंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. पूर्वी जिल्ह्यात 3588 केंद्र होते. त्यात वाढीव मतदान केंद्रानुसार 29 मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण झाले आहे. तर 20 केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात आले आहेत. तसेच 11 केंद्रांच्या नावात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सद्यःस्थितीत 3559 मतदान केंद्र अस्तित्वात आहेत.

जिल्ह्यातील मतदार संख्या आकडेवारी

जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका निहाय 17 लाख 92 हजार 501 पुरूष, 16 लाख 49 हजार 7 महिला तर 115 तृतीय पंथी असे एकूण 34 लाख 41 हजार 623 मतदार संख्या आहे. शिवाय सैनिक मतदार नोंदणीनुसार जिल्ह्यात सात हजार 885 पुरूष 127 महिला सैनिक पत्नी असे एकूण 8012 सैनिक मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. एक हजार पुरूषांमागे 920 स्त्री मतदार असे नोेंदणी प्रमाण आहे. ते पूर्णपणे वाढ होणे आवश्यक असल्याचेही निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी म्हटले आहे.

राजकीय पक्षांनी बूथनिहाय प्रतिनिधी नियुक्ती आवश्यक

जेणेकरून एकही व्यक्ती मतदानापासून वंचित रहाणार नाही, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतदान बूथनिहाय मतदार प्रतिनिधी नियुक्त करणे आवश्यक आहे. नवमतदार नोंदणीसह वाडे पाडे वस्तीवर तसेच भटके कामानिमित्त स्थलांतरीत मतदारांसाठीदेखील या विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात नोंदणी केली जाणार आहे.