मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रवींद्र वायकरांच्या विजयावर सध्या विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वायकरांनी आता विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
रवींद्र वायकर म्हणाले की, “सायंकाळी ५.४१ मिनीटांनी मी टीव्हीवर बघितलं की, अमोल कीर्तीकर २२०० मतांनी विजयी झालेत. पण हे कसं होऊ शकतं? ते कळल्यानंतर मी वृत्तवाहिनीला फोन करून विचारलं की, तुम्ही हे कसं काय चालवलं? ५.५१ वाजता जर एक लाखांहून अधिक मतमोजणी बाकी आहे तर तुम्ही जिंकले असं कसं काय म्हणू शकता? याचा अर्थ आतून कुणीतरी सांगितलं असावं. त्यानंतर मी ६ वाजता तिथे पोहोचलो. ते म्हणाले की, आमची मतमोजणी सुरु आहे. आम्ही आणखी घोषित केलेलं नाही. मग हे कोणी केलं?” असा प्रश्न त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “पहिली बॅलेट पेपरची मतमोजणी सकाळी ८ वाजता झाली. ती संपल्यानंतर सर्वांकडे आकडे गेलेत. त्यानंतर ज्यावेळी त्यांनी ईव्हीएम चेक करायला घेतलं त्यावेळी अमोल कीर्तीकर एकने प्लस होते. पण जर मशीन हॅक करायचं होतं तर मी एकने प्लस राहणार. मी हजार दोन हजाराने प्लस जाणार. मग ते कसे काय प्लस गेलेत? मला बॅलेट पेपरने वाचवलं. बॅलेट पेपरची टोटल केल्यानंतर मी ४८ मतांनी प्लस झालो. त्यावेळी त्यांचे २० प्रतिनिधी आतमध्ये होते. मग प्रश्न हा होता की, हॅक केलं जाऊ शकतं का? कोणीतरी म्हणालं की, शपथ घेऊन वगैरे पण ती काय आईची शपथ आहे का?,” असे म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच असं काही मोबाईलच्या माध्यमातून हॅक करता येत असेल तर त्यांनी सिद्ध करुन दाखवलं तर जगात कळू कळतं. साडे चार लाख लोकांनी मतदान केलं आणि मला कायदेशीर निवडून दिलं आहे, असेही ते म्हणाले.