तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। देवगाव तालुका पारोळा मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका मद्यधुंद वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली आहे. हि घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत चिमुरडी गंभीररीत्या जखमी झाली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, देवगाव येथील पूजा अनिल भिल ही सहा वर्षीय चिमुरडी गावातील वसंत जिभाऊ नगर परिसरात रस्त्याच्या कडेला चालत असताना मागून देवगावफाट्याकडून देवगावकडे नीलेश संजय बेलदार याने त्याचा आयशर ने (एमएच ०४, एचएस ४७३१) चिमुरडीला चिरडले. नशेत भरधाव वेगाने पळवत असताना पूजाला जोरदार धडक बसल्याने ती गाडीखाली चिरडून गंभीररित्या जखमी झाली.
परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळी चालकाला ताब्यात घेतले आणि चिमुरडीला १०८ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता वाटेतच तिचा मृत्यू झाला. हि सहा वर्षीय चिमुरडी जिल्हा परिषदच्या शाळेत पहिली वर्गात शिकत होती. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.