भोपाळ: अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरातील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही ऐतिहासिक घटना आहे. राज्यातील हिंदू देवतांशी संबंधित सर्व ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जातील, अशी घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली. सोमवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे भेदभावरहित सुसंवादी समाजाची निर्मिती होऊन रामराज्याची संकल्पना साकार होणार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा ऐतिहासिक क्षण होता. मध्यप्रदेशातील जी ठिकाणे प्रभू श्रीरामांच्या पदस्पशनि पावन झाली ती सर्व ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुशासन प्रस्थापित झाले आहे. आता खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ येणार आहे. जवळपास १४२ कोटी लोकांनी सरकारच्या पाठीशी उभे राहून जातीय सलोख्याचे उदाहरण दाखवून दिले, असेही मोहन यादव म्हणाले. त्यांनी अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशातील नागरिकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी दीप प्रज्वलित केले. प्रभू श्रीरामांची पूजा केली आणि जय श्रीरामचा जयघोष केला.