जळगाव : महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंत मालमत्ता करापोटी सर्वांत अधिक म्हणजेच ११० कोटींचा भरणा झाला आहे. शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर १००% शास्ती माफीची अभय योजना ८ फेब्रुवारीपासून सुरू केली होती. तिचा कालावधी ३१ मार्च अखेर पर्यंत होता. रविवार ३१ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून १ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा करून घेण्यात आलेला आहे. तर उद्या सोमवार १ एप्रिलपासून थकबाकी रकमेवर २४% शास्तीची आकारण्यात येईल.
सोमवारपासून थकबाकीवर लागणार २४ टक्के शास्ती
ज्या थकबाकी मालमधारकांनी शास्ती माफी अभय योजनेचा लाभ दित्यावर सुद्धा लाभ घेतलेला नाही अशा थकबाकी करधारकांवर उद्या १ एप्रिलपासून थकबाकी रकमेवर २४% शास्तीची आकारणी मनपा प्रशासनाकडून केली जाणार आहे. थकबाकीधारकांच्या मालमत्तेचा होणार जाहीर लिलाव थकबाकी मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याबाबत कार्यवाही मनपा प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात येत असून अशा मालमत्तांवर बोजा चढवण्याची कार्यवाही ही मनपा अधिनियम अंतर्गत करण्यात येणार आहे याची मालमत्ताधारकांनी नोंद घ्यावी असे मनपा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
रविवारी ३ कोटी ७५ लाखांचा भरणा
८ फेब्रुवारी पासून ७५ हजार १६० मालमत्ताधारकांनी ११० कोटी रुपये मालमत्ता कराचा भरणा केला आहे. यात १५ हजार ४०५ मालमत्ताधारकांनी २०.७५ कोटी रुपये ऑनलाईन भरले आहेत. शास्ती माफीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी ३ कोटी ७५ लाखांचा भरणा करण्यात आला.