मनपा आयुक्तांना औरंगाबाद खंडपीठाचे वॉरंट

जळगाव :  महानगरपालिकेत सेवेत असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर नियुक्ती मिळण्यासाठी दाखल अर्ज नाकारत्याने औरंगाबाद खंडपीठात २०२१ मध्ये याचिका दाखल आहे. यात दोन वेळा नोटीस बजावूनही महापालिकेतर्फे कोणीही हजर झाले नाही म्हणून खंडपीठाने थेट आयुक्तांविरूध्द जामीनपात्र वॉरंट काढत १४ फेब्रुवारीला हजर राहण्याचे फर्माण काढले आहे.

दुर्गादास सुनील सैदाणे यांनी महापालिकेच्या विरूध्द याचिका दाखल केली आहे. अनुकंपाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर नाव असताना प्रशासनाने त्यांच्या आईचे नाव यादीत असल्याने दुर्गादासचे नाव वगळले होते. याप्रकरणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी २९ जानेवारी २०२१ व २६ ऑगस्ट २०२२ रोजी नोटीस काढली होती. परंतु मनपाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे २४ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरूध्द जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.