मनपा जळगावकरांना प्रेमाची भेट देण्याच्या तयारीत; करदातेही पडतील ‘प्रेमात’

जळगाव: येत्या ‘व्हॅलेटाईन डे’ला समस्त जळगावकरांना महापालिका प्रशासन एक प्रेमाची भेट देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचे नियोजन प्रशासन करत आहे. या नियोजनानुसार जर सारे घडून आले तर या प्रेमाच्या भेटीची सफर सर्वांना मनसोक्तपणे अनुभवता येणार आहे. तसे झाले तर करदातेही मनपाच्या ‘प्रेमात’ पडतील.

महापालिकेतर्फे शहरातर्गत प्रवास करण्यासाठी पुण्याच्या प्रसन्ना ट्रॅव्हल्सच्या सहकायनि प्रथमच शहर बस सेवा सुरू करण्यात आली होती. बस सेवेला जळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. हे पाहता धुळे महापालिकेनेही याच कंपनीशी करार करून धुळ्यातही मनपाची शहर बस सेवा सुरू केली होती. मात्र सहा महिन्यातच या सेवेला घरघर लागली.

वर्ष-दीड वर्षानंतर पुन्हा स्थानिक पातळीवरील मक्तेदाराकडून शहर बस सेवा सुरू केली. यावेळीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु बसेस उभ्या राहण्यासाठी स्टॅड न मिळाल्याने त्या कोठेही कशाही उभ्या राहू लागल्या. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. वाहतूक पोलिसांनी या बस चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नंतर दंड करणे सुरू केले. यातही काही वाद निर्माण होत ही सेवाही बंद पडली.

नियोजनानुसार झाले तर व्हॅलेंटाईन डेचे ठरले गिफ्ट 

केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन ने पीएम. ई बस सेवेचे नियोजन केले आहे. त्यानुसार पीएम बस सेवेचे मुख्यालय हे टीबी रुग्णालय राहणार आहे. तर शहरात जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक हे वापरण्यापुरता देण्याचे पत्र महापालिकेने एस.टी. महामंडळाला दिले आहे. याबाबत अजून एस. टी. महामंडळाने कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मनपा हा विषय आता जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार आहे. त्यात जर हा प्रश्न सुटला तर नवीन वर्षातील व्हॅलेंटाईन डे पासून पीएम ई बस सेवा प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे सहाआयुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.

केंद्राकडून लवकरच मंजुरी या योजनेसाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याकडून याबाबतचा अहवाल केंद्राकडे पाठविला असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यात सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करून १४ फेब्रुवारी २०१४ पासून पीएम ई बस प्रत्यक्षात रस्त्याने धावणार असल्याचा विश्वासही सहाआयुक्त गणेश चाटे यांनी व्यक्त केला.

..तर नागरीकही देतील प्रेमाचे रिटर्न गिफ्ट

मनपाच्या नियोजनाप्रमाणे फेब्रुवारी २०२४ ला पीएम ई बस सेवा सुरू झाली तर नागरिकही शहरातंर्गत प्रवासासाठी स्वस्तातील ई बसने प्रवास करून रिटर्न गिफ्ट देतील.

जेएमटीयू ते पीएम ई बस सेवा

दोन वेळा चांगल्यापैकी सुरू झालेली महापालिकेची जेएमटीयु शहर बस सेवेला घरघर लागत ती बंद झाली. त्यानंतर पाच ते सहा वर्षाचा कालावधी उलटला. आता मनपा किंवा एस.टी. महामंडळातर्फे शहर बस सेवा सुरू होईल असे कोणाला वाटले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार पीएम ई योजना सध्या देशभरात राबविण्यास सुरुवात होत आहे. या योजनेच्या निकषानुसार योजनेत जळगाव महापालिकेचा समावेश करण्यात आला आणि ई बस सेवेबाबतच्या हालचालींना वेग आला. यात महापालिकेला कोणताच खर्च करावा लागणार नाही.