मनरेगाच्या कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट; मजुरीत केली वाढ, 1 एप्रिलपासून नवीन मजुरी दर लागू होणार

केंद्र सरकारने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या मजुरीत वाढ केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी 28 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढलेले वेतन दर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आहेत. मनरेगा कामगारांसाठी 1 एप्रिल 2024 पासून नवीन मजुरी दर लागू होतील. नव्या दरांनुसार आता प्रत्येक राज्यातील कामगारांना जास्त वेतन मिळणार आहे.

नवे दर काय आहेत?
गोव्यातील कामगारांना पूर्वी 322 रुपये प्रतिदिन मिळत होते, ते आता वाढून 356 रुपये झाले आहे.

कर्नाटकात मनरेगाचा दर 349 रुपये झाला आहे, जो पूर्वी 316 रुपये प्रतिदिन होता.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मनरेगा कामगारांचा मजुरी दर 221 रुपयांवरून 243 रुपये प्रतिदिन झाला आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मजुरांची रोजची मजुरी 230 रुपयांवरून 237 रुपये झाली आहे.

हरियाणा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मनरेगा कामगारांचे दर 7 टक्क्यांनी वाढले आहेत. आता त्यांची रोजची मजुरी 267.32 रुपयांवरून 285.47 रुपये झाली आहे.