MNS: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जनतेनं महायुतीला कौल देत भरघोस यश त्यांच्या पदरी पाडलं. मागच्या दोन इलेक्शनपेक्षा 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपने एकट्याने स्वबळावर 130 पेक्षा जास्त जागा जिंकल्या.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. गेल्या निवडणुकीत तरी मनसेचा एक आमदार जिंकून आला होता. पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेला या निवडणुकीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडणूक आयोगाचा पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे निकष असतात. 1 आमदार किंवा एकूण मतदानांच्या 8 टक्के मतं मिळाली तर त्यांची मान्यता राहते. 2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं, 3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3 टक्के मतं मिळायला हवीत. या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता राहते. नाहीतर मान्यता काढली जावू शकते”, असं अनंत कळसे यांनी सांगितलं. दरम्यान, या निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? याबाबतही त्यांनी भाष्य केलं.
“निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेवू शकतात. निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतं. सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही”, असं देखील अनंत कळसे यांनी यावेळी सांगितलं.
मतदारांच मनसे पक्षावरील विश्वास गमवण्या मागचं कारण काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी चर्चेत असतात. त्यांचा चाहतावर्ग सुद्धा भरपूर आहे. पण यासोबतच मनसे अध्यक्षांची सतत बदलणारी भूमिका हे सुद्धा विश्वास गमावण्यामागच एक कारण आहे. पक्ष स्थापनेनंतर विकास, त्यानंतर मराठीचा मुद्दा आता हिंदुत्व. म्हणजे खूप कमी काळात पक्षाची भूमिका बदलत गेली आहे. मनसे वाढत नाही, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणतात, शिवसेनेला स्थापना झाल्यानंतर सत्तेत पोहोचायला बरीच वर्ष लागली. पण या काळात शिवसेना वाढत होती. या उलट 2009 ला मनसेचे एकाचवेळी 13 आमदार निवडून आले. 2012 ला नगरसेवक सुद्धा चांगल्या संख्येने निवडून आले. पण त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली, ती अजूनही कायम आहे.