रामभूमी अयोध्येत रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेचा पूर्वरंग उत्सव सुरू झाला आहे. पाच शतकांहून अधिक काळाचा विजनवास भोगणार्या प्रभू रामचंद्रांच्या मुक्ततेसाठी केलेल्या संघर्षाचे समाधान या मनुनिर्मित नगरीच्या कानाकोपर्यात ओसंडून वाहात आहे. ते अनुभवणार्या प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून यावा, नकळत का होईना, कोणत्या तरी संस्काराची ठेव म्हणून मनाच्या कोपर्यात जपलेला भक्तिभाव जागा व्हावा आणि समाजाच्या भावनांशी आपल्या मनाच्या भावनाचे नाते जडून समाधानाने, आनंदाने आणि भक्तिभावाने डोळ्याच्या कडा नकळत ओलावून जाव्यात, हे घडणे साहजिकच! तसेच परवा घडले. मुळात, कोणत्याही दुःखाने अंतःकरणात वेदना व्हाव्यात आणि कोणत्याही आनंदवार्तेने मनाला आनंद व्हावा, हे तर माणुसकीचे, संवेदना जिवंत असल्याचेच लक्षण असते.
अयोध्येतील आनंदमहोत्सवाचा अनुभव लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एका वृत्तवाहिनीची प्रतिनिधी तेथे पोहोचली, लोकांशी बोलताना, त्यांच्या आनंदभावना अनुभवताना तिच्या भावनाही क्षणभर अनावर झाल्या आणि माध्यमक्षेत्रात वादळ उठले. अगोदरच, प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जसजसा जवळ येईल तसतशी पोटदुखी वाढत असल्याच्या अनुभवाने अनेकांमध्ये अस्वस्थता बळावली आहे, त्यात एका पत्रकार महिलेस चक्क भक्तिभावाने रडू कोसळले, या क्षणाच्या साक्षीदार होण्याच्या संधीबद्दल तिला स्वतःस धन्यता वाटू लागली आणि तिने तसे जाहीरपणे कबूलही केले, तेव्हा याच जमातीत अस्वस्थता पसरली. एक पत्रकार असूनही तिने आपल्या भावनांची जाहीर कबुली द्यावी, हे जणू पत्रकारितेच्या पेशाला अमान्य असावे, असा निवाडा देण्याची स्पर्धा सुरू झाली, आणि संकेतांची चर्चाही सुरू झाली.
पत्रकारांना दोन मने असतात. त्यातलं ए मन त्याचं स्वतःचं, लहानपणापासून सोबत असणारं आणि दुसरं, पत्रकाराचं… या पेशाची बांधिलकी स्वीकारल्यापासून सोबत करणारं. जसजसा काळ पुढे सरकतो, तसतसं दुसरं, पत्रकाराचं मन पहिल्या मनापेक्षा शिरजोर होत जातं. त्याचा प्रभाव वाढतो. आणि स्वत:चं मन मागे पडतं. म्हणूनच, एखादी भीषण बातमी कानावर आल्यावर सर्वसामान्य माणसाला पहिल्यांदा हळहळ वाटते, त्याच बातमीवरची पत्रकाराची पहिली प्रतिक्रिया मात्र, हेडलाईन मिळाल्याच्या आनंदाची असते. पत्रकाराचं मन त्या बातमीतून त्याच्या व्यावसायिक नीतीच्या पहिल्या बांधिलकीची आठवण करून देतं. मग काही काळानं ते मन शांत झालं, की मूळ मन जागं होतं, आणि त्या घटनेबद्दल वाटणारी हळहळ व्यक्त करू लागतं.
यामुळेच, पत्रकाराला कोणत्याही गोष्टीकडे संयतपणे पाहायची सवय झालेली असते. म्हणजे, तो कोणत्याही प्रकारात भावनिकदृष्ट्या गुंतून पडत नाही. त्रयस्थपणे एखाद्या घटनेकडे पाहिले, की त्याचे संतुलित विश्लेषण करणे त्याला शक्य होते. हा पत्रकाराच्या अंगी पेशाने रुजविलेला गुण असतो. तरीही पत्रकाराची दृष्टी वेगळी असते. कारण, ती दृष्टी प्रत्येकाला लाभलेली नसते. म्हणून त्याच्या दृष्टीतून अवतीभवती पाहायची इतरांना सवय लागते. पत्रकाराच्या नजरेनं टिपलेलं काहीही, आपल्यासमोर घडलेलं असलं, तरी ते दुसर्या दिवशी पुन्हा वर्तमानपत्रातून किंवा काही वेळानंतर पुन्हा टीव्हीवरून पाहण्यात एक वेगळेच समाधान असते.
अलिकडे, माध्यमांच्या गर्दीत, सोशल मीडियाची भर पडली आहे. हे माध्यम आता प्रत्येकासाठी उपलब्ध असल्याने, सामान्य माणसाला व्यक्त होण्याची संधी मिळू लागली आहे. त्यामुळे, त्याच्या नजरेतही आता काहीसा बदल होऊ लागला आहे. पण अजूनही ही नजर परिपक्व नाही. आपण काय टिपावे आणि काय इतरांपर्यंत पोहोचवावे याचे भान अजूनही समाजमाध्यमांवरून व्यक्त होणार्या मनांना पूर्णपणे आलेले नाही.
मध्यंतरी एकदा, रस्त्यावरून जाताना मी एक दृश्य पाहिले. रस्त्याकडेच्या एका उकिरड्यावर काहीतरी भरलेली पिशवी कुणीतरी फेकली. काही क्षणातच, फाटके कपडे घातलेली, केस विस्कटलेली, मळलेली आणि अशक्तपणामुळे खुरटलेली एक लहान मुलगी जिवाच्या आकांताने धावत तिथे पोहोचली. ती पिशवी उचलणार, तेवढ्यात दुसर्या बाजूने काही कुत्री तेथे आली. आणि पिशवीचा ताबा मिळविण्यासाठी ती मुलगी आणि कुत्री यांच्यात संघर्ष सुरू झाला. काही वेळ त्या मुलीने जिवाची बाजी लावली. पण अखेर ती हरली. निमूटपणे पिशवी सोडून ती मागे झाली आणि कुत्री, आनंदाने पिशवी तोंडात धरून निघून गेली. ती मुलगी केविलवाण्या नजरेनं पाठमोर्या कुत्र्यांकडे पाहात होती… रस्त्यावरची गर्दी, आपल्या गतीने पुढे सरकतच होती.
आणखी एक घटना, अशीच माझ्या पहिल्या मनावर कोरली गेलेली. एकदा मी एका वृद्धाश्रमात गेलो होतो. मला पाहताच, बाहेरच्या बाकड्यावर बसलेली एक वृद्धा धावतच माझ्याकडे आली आणि मला तिने मिठी मारली. मी गोंधळलो होतो. काही वेळाने ती शांत झाली. पुन्हा बाकड्यावर बसली आणि बोलू लागली. ‘किती दिवसांनी आलास रे. मी किती वाट पाहात होते. बघ, पिशवी अजून सोडली पण नाहीये. चल आता मला घरी घेऊन चल. नातवंडं वाट पाहात असतील… मागच्या अंगणातली तुळसपण सुकून गेली असेल…’
मी सुन्न झालो होतो. तिची कशीबशी समजूत काढून मी त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाशी बोलू लागलो आणि त्या वृद्धेची कहाणी उलगडत गेली. ती वृद्धा एका संपन्न घरातली. पेन्शनर. मुलाचा मोठ्ठा बंगला… वय झाल्यावर तिचं मन ताळ्यावर राहात नव्हतं. भरकटायची. काहीतरी बोलायची. आजारीही पडायची. एके दिवशी मुलगा म्हणाला, आपण गाणगापूरला जाऊ. देवाचं दर्शन घेऊन येऊ. ही खुश. घाईत पिशवी भरली आणि मुलाच्या गाडीत जाऊन बसली. गाडी थेट वृद्धाश्रमासमोर आली. मुलानं तिला आत आणलं. याच बाकड्यावर बसवलं… काहीतरी सांगून तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. आणि मी जरा जाऊन येतो असं सांगून तो बाहेर पडला.
तेव्हापासून ही म्हातारी मुलाची वाट पाहातेय्…
अशा असंख्य घटना आजूबाजूला घडताहे… आपण सहिष्णू आहोत. आपल्याला असहिष्णुता सहन होत नाही. मग एखाद्या घटनेचे साक्षीदार होताना संवेदना जिवंत झाल्या, भावना उचंबळून आल्या आणि त्या व्यक्त कराव्यात असे मोकळेपणाने वाटले, तर त्यात गैर काहीच नाही, असा विचार व्हायला हवा. कोणत्या तरी एखाद्या घटनेवरून गदारोळ माजतो, त्यावरून आंदोलने पेटतात, राजकीय हेवेदावे उफाळतात आणि सहिष्णू-असहिष्णू ठरविण्याची जणू स्पर्धा सुरू होते. या समस्या नसतात, असे नाही. पण असल्या, तरी समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, आपला प्राधान्यक्रम कोणता हे आपणच ठरविले पाहिजे. ज्या एखाद्या गोष्टीमुळे सामाजिक ऐक्याचा एक नवा धागा गुंफला जाणार आहे, भक्तीच्या एकाच भावनेने सारा समाज एकरूप होण्याची नवी प्रक्रिया सुरू होणार आहे, त्या गोष्टीच्या अनुभवाचे सहज प्रदर्शन झाले, तर ते असह्य वाटावे, त्यावर आरडाओरडा सुरू व्हावा आणि अशा अनुभवाने धन्य झाल्याची भावना व्यक्त झाली, तर त्यावरून समाजमाध्यमी मंचावर पोटदुख्यांचा गदारोळ व्हावा, हे सहिष्णुतेचे लक्षण खचीतच नाही. समाजमाध्यमांचा वापर करताना, सहिष्णुता आणि असहिष्णुता या भावनांचा विवेक बाळगण्याची गरज अशा प्रसंगांतूनच अधोरेखित होत असते.
काही वर्षांपूर्वी, मुंबईजवळच्या एका शहरातील एक तरुण, लोकलच्या गर्दीत उभं राहायलाही जागा न मिळाल्याने, हात सुटून तोल जाऊन पडला आणि मरण पावला. पाऊल ठेवण्याएवढी तरी जागा मिळावी यासाठी त्याआधी तो गर्दीला आकांतानं विनवत होता. पण तो आकांत गर्दीच्या कानावर गेलाच नाही. अखेर त्याचा अंत झाला. दुर्दैव म्हणजे, त्याच वेळी कुणीतरी त्याचा तो आक्रोश, कॅमेर्यात टिपत होता. त्या क्षणाचं व्हिडीओ शूटिंग करत होता. नंतर त्याने ते फेसबुकवर टाकले आणि ते घरोघर पोहोचलं. त्या वेळी सहिष्णुता कुठे गेली असावी? समाज माध्यमांवरही काही मूल्यांची बंधने असण्याची गरज अशा उथळपणातून अधोरेखित होत आहे.
आजच्या सहिष्णुता-असहिष्णुता संघर्षाच्या काळात ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
आज, पश्चिमेस मावळणारा सूर्य तोच असेल. त्या दिशेला फुटणार्या सोनेरी रंगछटाही वेगळ्या नसतील. समुद्रकिनारी पाण्यात बुडणारा सूर्याचा तो गोळाही नेहमीचाच असेल… पण संध्याकाळी ते पश्चिमरंग मनामनावरही काही वेगळ्याच रंगछटा उधळून मावळणार आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत, आपल्या सर्व रंगछटांचे विभ्रम उधळणार्या छायाचित्रासह ते पहिल्या पानांवर झळकणार आहे, आणि ते न्याहाळताना, नकळत मन मागे सरलेल्या मावळलेल्या वर्षात जाऊन घुटमळणार आहे…
हे नक्कीच घडणार आहे. खरं म्हणजे, काळ दोनच असतात. भूतकाळ, तो स्पष्टपणे अनुभवता आलेला असतो. आणि वर्तमानकाळ आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो. भविष्यकाळ ही एक संकल्पना आहे. तो अनुभवता येत नाही. वर्तमानकाळच क्षणाक्षणाने भविष्यकाळाकडे सरकत जातो, तेव्हा भविष्यकाळातील गाठलेल्या प्रत्येक क्षणाचे रूपांतरही वर्तमानकाळातच होत असते. तरीदेखील आपण भूतकाळातील रम्य क्षणांच्या आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन, न अनुभवता येणार्या भविष्यकाळाकडे वाटचाल करतच असतो.
दिवस मावळला की आपण नव्या भविष्यकाळाकडे वाटचाल करणार आहोत. नवे वर्ष सुरू होणार या जाणिवाच आज अनेकांची मने उत्फुल्ल करत असतील. नव्या वर्षाच्या स्वागताचे क्षण साजरे करण्याचे ज्याचे त्याचे संकल्प आखूनही झालेले असतील. या संकल्पांची एक गंमत असते. दोन क्षणांचे एकत्रपणे साजरेपण त्यामध्ये साधले जाणार असते. मावळत्या वर्षाचा अखेरचा क्षण नव्या वर्षाचा पहिला क्षण हाती धरून आपल्यासमोर येतो. मला तर, विवाह सोहळ्यात, वधूला हाताला धरून बोहरल्यावर चढविणार्या मामाच्या मनात आणि नववधूच्या मनात भावनांचा कोणता कल्लोळ चालला असेल, याची उत्सुकता असते. उद्या, नव्या वर्षाला हाताला धरून आणणार्या मावळत्या वर्षाचा अखेरचा क्षणदेखील मला नववधूला हाताशी धरून बोहल्यावर चढविणार्या त्या मामाच्या मनासारखाच घालमेल करणारा वाटतो. म्हणून, त्या, मावळत्या वर्षाच्या अखेरच्या क्षणाशी मला माझी अधिक जास्त जवळीक वाटते. कारण, तो क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो. भविष्यकाळास सोबत घेत आपल्या स्वाधीन करण्याची मोठी जबाबदारी त्या क्षणाच्या अंगावर असते. ती जेव्हा तो सुरक्षितपणे पार पाडतो, तेव्हा मनावरचे मणाएवढे ओझे हलके होऊन तो क्षण मनातल्या मनात सुटकेचा सुस्काराही टाकत असेल आणि भूतकाळाच्या कप्प्यात स्वतःस अलगद गडपही करून घेत असेल… उद्या, जेव्हा आपण या क्षणांच्या आदानप्रदानाचा क्षण अनुभवत असू, तेव्हा तुम्हीही याची कल्पना करून पाहा… असे, क्षणांचे आदानप्रदान अखंडपणे सुरू असतेच. उद्याच्या, मावळत्या वर्षाचा अखेरचा क्षण आणि नव्या वर्षाचा पहिला क्षण यांचा मिलाफ मात्र, प्रत्येकास अभूतपूर्व वाटतो. कारण, तो वर्षातून एकदाच येतो…
म्हणून, त्याच्या अनुभूतीची मानसिक तयारी हा एक सोहळा असतो. आजपासून तो सुरूही झाला आहे. समाज माध्यमांनी अशा प्रसंगांत माणसाला मोठा दिलासा दिला आहे. समाज माध्यमांनी मनामनांतील अंतर वाढविले, अशी खंत अलिकडे उगीचच व्यक्त होत असते. पण समाज माध्यमांनी मनांची ही संकुचितता पार बदलूनही टाकली आहे. काल सकाळी जाग येताच सवयीप्रमाणे मोबाईल उघडला, तेव्हा अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुलाबाच्या टवटवीत ताटव्यांसोबतचा एक संदेश मनाला आश्वस्त करून गेला. शुभ शनिवार.. हा तो संदेश… खरे तर, आठवड्यागणिक येणार्या सात दिवसांतील तो एक दिवस. वेगळेपण काही नाही… तरीही, तो वाचला आणि आजचा दिवस चांगला जावा यासाठी कुणीतरी आपल्याकरिता सदिच्छा दिल्या या भावनेने मनाला आनंद झाला. समाज माध्यम नसते, तर शुभ शनिवार असे म्हणणारा कुणी प्रत्यक्षात भेटला असता, असे मला वाटत नाही. या माध्यमाने प्रत्येक दिवसाला सणाचा साज चढविला आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणाला आधाराचा हातही दिला आहे. असा सहिष्णुपणा या माध्यमांच्या मंचावर दिसायला हवा. पण अयोध्येत वार्तांकन करणार्या त्या महिला पत्रकाराच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू पाहून मात्र, या मंचावर अनाकलनीय गदारोळ सुरू झाला. हे अनाकलनीय आहे!
उद्या नववर्षाच्या पहिला क्षणाला समाज माध्यमांवरच शुभेच्छा संदेशांचा वर्षावही सुरू झालेला असेल. ओळखीच्या, अनोळखीतील, सारे जण एकमेकांना शुभेच्छा देऊन नव्या वर्षातील अनोळखी भविष्यकाळास सामोरे जाण्याची हिंमत देतील. प्रत्येक क्षणाला मागे टाकून नव्याने येणारा नवा क्षण आपला की परका, हे आपण कुठे पाहात असतो. तो प्रत्येक क्षणच आपला असतो. मग अशा क्षणांचे गाठोडे घेऊन येणारे नवे वर्षही आपलेच असते… त्यासाठी शुभेच्छा हव्यातच…म्हणूनच, नव्या वर्षाच्या पहिल्या क्षणी येणार्या शुभेच्छांच्या गर्दीत, आमचीही सर्वांसाठी एक शुभेच्छा…नवे वर्ष सर्वांना आनंदाचे, मनोबलाचे, सुखाचे जावो…
– दिनेश गुणे