मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत आरक्षण मिळावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील कायम आहेत. आपल्या या मागणीसाठी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीयेथे उपोषणास प्रारंभ केला आहे, आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री सलाईन लावण्यात आली. सोलापूर मधील आमदार राजेंद्र राऊत यांनी काल रात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आमदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा केली. त्यांनतर आ. राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यानंतर जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर सलाई लावली.
पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षण तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही, सरकारच्या वतीनं आरक्षण विषय लवकर तडीस नेण्याचं आश्वासन मिळालं आहे. आमदार राऊत निरोप घेऊन आले होते. आश्वासन मिळाल्यानं सलाईन लावली आहे. मराठा बांधव मला भेटायला येत आहेत, त्यांनी इकडे येऊ नये. मराठा बांधवांनी इकडे गर्दी करू नये. शेतीची कामं उरकून घ्यावीत. मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी. सर्वांनी या आपल्या एकजुटीचा धसका घेतला आहे.