नागपूर : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या विरोधात SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जरांगे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे .
असे असतानाच भाजप नेते आशिष देशमुख यांनी जरांगे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या याच दाव्यामुळे आता आता राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलतांना आशिष देशमुख म्हणाले की, बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं.
आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले. तसेच राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे.