मन सुन्न करणारी घटना; काम आटोपून घराकडे निघाले; अर्ध्या वाटेतचं…

स्कूटीला भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना बीड जिल्हयात घडलीय. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

स्वाती शिवनारायण गोंडे असे मयत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी वडील शिवनारायण गोंडे यांच्यासोबत काही कामानिमित्त वडवणी शहरात आले होते. काम आटोपून दोघेही आपल्या स्कूटीवरुन चिंचोली गावाकडे घरी जायला निघाले.

दरम्यान, बीड -परळी महामार्गावरील वडवणी शहराजवळ त्यांच्या स्कूटीला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत स्वाती शिवनारायण गोंडेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील शिवनारायण गोंडे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा करुण अंत झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.