कोलकाता : आर जी कर बलात्कार प्रकरणात एका विद्यार्थ्य़ाने डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्काराचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाब विचारला आहे. यामुळेच आता जाब विचारणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी युवकाला अटक केली. ममता बॅनर्जींना जाब विचारणे युवकाची चूक आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रसारमाध्यमानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीना जाब विचारणाऱ्या तरूणाचे नाव हे साग्निक लाहा असे आहे. साग्निक लाहा पेशाने पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यामुळे त्याला अटक करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. तसेच युवकाने ममता बॅनर्जीना अपमानीत करणाऱे वक्तव्य केले होते, असा दावा पोलिसांनी केला होता.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साग्निक लाहाने तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांना टार्गेट केले होते. त्यांना त्रास दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी साग्निक लाहाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी साग्निकला अलीपुरद्वारा जंक्शनहून अटक करण्यात आली.
दरम्यान याप्रकरणात साग्निक लाहाचे वकील दीपशिखा रॉय यांनी सांगितले की, युवकावर भारतीय न्याय संहिता कलमान्वये ७९. २९४ आणि २९६अ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी १७ ऑगस्ट लाहा यांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी साग्निक लाहा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.