ममता बॅनर्जी यांचा ‘काँग्रेसवर’, जोरदार हल्लाबोल. म्हणाल्या ३०० जागांपैकी….

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस किमान ४० खासदार निवडून आणू शकलं तरी खूप झालं, असे त्या म्हणाल्या. याशिवाय राहुल गांधींना वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे. मी इंडी आघाडीचा भाग असूनही पश्चिम बंगालमध्ये राहूल गांधींच्या नेतृत्वात आलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयी मला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जींनी शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राहूल गांधींवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “काँग्रेस ३०० पैकी ४० जागाही जिंकेल की नाही हे मला माहीत नाही, तरीसुद्धा हा अहंकार कशासाठी? तुम्ही बंगालला आलात, पण मला सांगितलंही नाही. आम्ही इंडी आघाडीचा भाग आहोत. तुमच्यात हिम्मत असेल तर वाराणसीत भाजपला हरवून दाखवा. ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वी जिंकत होतात तिथेही तुम्ही हरला आहात,” असे त्या म्हणाल्या .

राहूल गांधींनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान घेतलेल्या विडी कामगारांच्या भेटीवरूनही ममता बॅनर्जींनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “फोटोशूट करण्याची ही एक नवीन शैली आहे. कधी चहाच्या टपरीवरही न गेलेले लोक आता विडी कामगारांसोबत बसण्याचे नाटक करत आहेत. हे सगळे प्रवासी पक्ष्यांसारखे आहेत,” असेही त्या म्हणाल्या आहेत. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने इंडी आघाडीत फुट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता ममता बॅनर्जींनी राहूल गांधींविरुद्ध वक्तव्य करत पुन्हा एकदा इंडी आघाडीत काहीही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले आहे.