मराठा आरक्षणाआड सुरू ठाकरे-पवारांचं राजकारण : राज ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण सुरु आहे, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. राज ठाकरे मराठावाडा दौऱ्यावर असताना यात अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ठाकरे-पवारांची पोलखोल केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या संपूर्ण दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकारण करत आहेत. मराठवाड्यातील काही पत्रकारही या गोष्टींमध्ये सहभागी झाले आहेत. मी धाराशीवला असताना मला तिथे काही लोक भेटायला आले होते. त्या लोकांना भडकावण्याचं काम हे पत्रकार करत होते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ‘एक मराठा लाख मराठा’ असं ओरडत गेला. याचा अर्थ यामागे जरांगे पाटील आहेत, हे त्यांना दाखवायचं आहे. पण त्यांच्या आडून यांचंच विधानसभेचं राजकारण सुरु आहे. जरांगे पाटलांच्या पाठीमागून मत मिळवण्यासाठी यांचं राजकारण सुरु आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. पण माझ्या नादी लागू नका,” असा इशाराही राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे.