नांदेड: मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती देखील खालवत आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मराठा आंदोलकाकडून रास्ता रोको केलं जात आहे. त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मराठा आंदोलकाकडून रास्ता रोको केलं जात आहे. त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.शुक्रवारी लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी सकाळपासून जिल्ह्यातील नऊ डेपोतील वाहतूक बंद करण्यात आली. रविवारीदेखील बस सेवा बंद आहे.
बसेस बंद ठेवल्यामुळे खासगी वाहतूकदारांना फायदा होत असल्याचं दिसत आहे. ऐन लग्न सराईत एसटी महामंडळाची सेवा बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच एसटी महामंडळाचे जवळपास ८० ते ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.